हट्टा खून प्रकरण:एकाच कुटूंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल, आरोपींच्या हालचालींवर पोलिसांची नजर
![]()
हट्टा येथील तरुणाच्या खून प्रकरणात एकाच कुटुंबातील पाच जणांवर हट्ा पोलिस ठाण्यात सोमवारी ता. १ गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील आरोपींवर परभणी येथील ज्या रुग्णालयात उपचार सुरु आहे त्या ठिकाणी पोलिसांनी करडी नजर ठेवण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. वसमत तालुक्यातील हट्टा येथे गावातील वर्चस्वाच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना रविवारी ता. ३१ रात्री घडली आहे. यामध्ये एका गटातील चौघे जण तर एका गटातील तिघे जण जखमी असून त्यांच्यावर परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये प्रविण दस्तके उर्फ देशमुख, प्रदीप देशमुख, शुभम देशमुख यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या प्रकरणात शुभम दस्तके देशमुख यांनी हट्टा पोलिसांकडे जवाब नोंदविला आहे. यामध्ये पाच जणांनी हट्टा येथील बसस्थानकाजवळ झालेल्या किरकोळ कारणावरून जिवे मारण्याच्या उद्देशाने खंजीराने पोटात वार केल्याचे नमुद केले आहे. यामध्ये रुद्र उर्फ अनिरुध्द यांच्या पोटात खंजीराने वार करून त्याचा खून केला असून तुम्हाला पाहून घेण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. यावरून हट्टा पोलिसांनी प्रणव भवर, पंकज भवर, प्रल्हाद भवर, उमेश भवर, योगेश भवर यांच्या विरुध्द खूनाचा व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक युवराज जवळी पुढील तपास करीत आहेत. या घटनेतील आरोपींवरही परभणी येथे उपचार सुरु असल्याने पोलिसांनी आता त्या रुग्णालयावर करडी नजर ठेवण्यासाठी दोन पोलिस कर्मचाऱ्यांची पथक नियुक्त करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. सध्या गावात पूर्णपणे शांतता असल्याचेही सुत्रांनी स्पष्ट केले.
