Maharashtra Rain Alert | सावधान! आज ‘या’ जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा
Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात 1 जून रोजी हवामानाचा रंग पुन्हा बदलला असून अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत. वादळी वाऱ्यांसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी मुसळधार सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांसह शेतकऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
1 जूनसाठी हवामान विभागाने राज्यातील एकूण 29 जिल्ह्यांना इशारा दिला आहे. त्यापैकी 23 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट तर 6 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांमध्ये ताशी 30 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळू शकतात. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्वच विभागांमध्ये हवामानाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट लागू आहे. या परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि जोरदार वारे वाहू शकतात. किनारपट्टी भागात वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज असल्याने समुद्रकिनाऱ्यालगत फिरणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि नाशिक (Nashik) जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून नंदुरबार, अहिल्यानगर आणि जळगाव येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert | मराठवाडा-विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता :
पश्चिम महाराष्ट्रात पुणे (Pune) आणि सातारा (Satara) जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी कोणताही अलर्ट नसला तरी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि जालना (Jalna) या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर येथे यलो अलर्ट कायम आहे. धाराशिव जिल्ह्यात विशेष अलर्ट नसला तरी काही ठिकाणी पावसाच्या सरी पडू शकतात. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
