पुणे विषारी दारू कांडचे भिवंडी कनेक्शन उघड:तुकाराम मुंढेंच्या आदेशाने कंपनीचे गोदाम सील, 5,929 किलो मिथेनॉलचा साठा जप्त

0
db-temp-cover-marathi-2026-05-30t164113639_1780139663.jpg




पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी गावठी दारूमुळे झालेल्या २२ निष्पाप नागरिकांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, या प्रकरणाचे धागेदोरे आता भिवंडीपर्यंत पोहोचले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच ॲक्शन मोडमध्ये येत भिवंडीत धाड टाकून मिथेनॉलचा प्रचंड साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कंपनीचे गोदाम सील करण्यात आले आहे. पुण्यातील भीषण दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या विषारी दारूमध्ये ज्या घातक रसायनाचा वापर करण्यात आला होता, त्याचा पुरवठा भिवंडीतील एका कंपनीतून झाल्याची माहिती तपासात समोर आली होती. या माहितीच्या आधारे एफडीएच्या पथकाने भिवंडीतील ‘मे. रेक्स इंटरनॅशनल’ या कंपनीच्या गोदामावर अचानक छापा टाकला. कंपनीच्या नोंदवहीत अधिकृत नोंद नाही या कारवाईत मानवी जीवनासाठी जीवघेण्या ठरणाऱ्या ‘मिथेनॉल’ या रसायनाचा सुमारे ५,९२९ किलोचा बेकायदेशीर साठा हस्तगत करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या घातक द्रव्याच्या साठ्याबाबत किंवा विक्रीबाबत कोणतीही अधिकृत नोंद कंपनीच्या नोंदवहीत आढळली नाही. कसा झाला पुरवठा? गुन्हेगारी साखळी उघड पोलिस आणि एफडीएच्या संयुक्त तपासातून या विषारी रसायनाच्या प्रवासाची संपूर्ण साखळी स्पष्ट झाली आहे. भिवंडीतून हे केमिकल कर्नालसिंग विरका, मुख्य आरोपी योगेश वानखेडे आणि उरळी कांचन येथील राजू प्रजापती यांच्या माध्यमातून पुण्यातील अड्ड्यांपर्यंत पोहोचले होते. केवळ अधिक नफा मिळवण्याच्या हव्यासापोटी या रसायनाचा वापर करून हातभट्टीची दारू तयार करण्यात आली. ही दारू सेवन केल्यामुळे २२ जणांचा मृत्यू झाला. तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये; राज्यभरात धाडसत्र २५ मे २०२६ रोजी एफडीए आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच तुकाराम मुंढे यांनी भ्रष्ट आणि सुस्त यंत्रणेला कडक ताकीद दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या सर्वच विभागांमध्ये एकाच वेळी विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत. ठाणे जिल्ह्यात राबवलेल्या मोहिमेत सुमारे ७ लाख ३० हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ६ मुख्य आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ४ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशीच कडक मोहीम सुरू राहील, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांशी चर्चा करून संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश दिले आहेत. विषारी दारू कुठे तयार झाली, त्यामागे कोणते लोक आहेत आणि संपूर्ण साखळी कशी कार्यरत होती याचा शोध घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. आतापर्यंत अनेक आरोपींना अटक झाली असली तरी आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता तपासली जात आहे. गंभीर रुग्णांना वाचवण्यासाठी वैद्यकीय प्रयत्न सुरू असून या मृत्यूकांडातील प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेला एक प्रकारची हत्या, असल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed