काँग्रेसमुक्त भारत म्हणजे काँग्रेस नेत्यांना पक्षात घेणे का?:सुप्रिया सुळे यांचा भाजपला सवाल; प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावरही केले भाष्य

0
image-resize-color-correction-and-ai-2026-05-30t17_1780140941.png




राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ संकल्पनेची खिल्ली उडवली आहे. काँग्रेसमुक्त भारत म्हणजे सर्व काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये घेणे आहे का? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच प्राजक्त तनपुरे यांनी आपल्याशी संपर्क साधूनच भाजपमध्ये प्रवेश केल्याचेही स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, अहिल्यानगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजप प्रवेशापूर्वी त्यांच्या अडचणी मला सांगितल्या होत्या. माझ्या सदिच्छा त्यांच्यासोबत आहेत. भाजपचा ‘काँग्रेसमुक्त भारत’ हा संकल्प असला तरी, अहिल्यानगरमध्ये राम शिंदे वगळता सर्व नेते मूळ काँग्रेसमधीलच आहेत. हेच नेते आता भाजपात जाऊन नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे नेमका काय बदल झाला, हे भाजपने स्पष्ट करावे. भाजपची विचारनिष्ठा आणि मूळ पक्ष कार्यकर्ते कुठे गेले, याचे भाजपने चिंतन करावे, असेही त्या म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांनी यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर सध्या कुठे दिसत नाहीत, असा टोलाही भाजपला लगावला. त्या पुढे म्हणाल्या, नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या प्रकरणाकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. गृहखाते पुण्यात 100 टक्के अपयशी ठरले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांना बेकायदेशीर दारूविक्रीची सर्व माहिती असतानाही विषारी दारूमुळे लोकांचे जीव जात आहेत. राज्याचे गृहमंत्रालय नेमके काय करत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ गुन्हेगारी रोखण्यासाठी लक्ष द्यावे, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून ती रोखण्यात सरकारला अपयश आले आहे. शिक्षण क्षेत्रातील ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरण दुर्दैवी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान असतानाही पेपरफुटीचे प्रकार घडत आहेत. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याने शिक्षण विभागाने याबाबत नैतिक जबाबदारी घेऊन उपाययोजना कराव्यात, असे आवाहन सुळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed