चंद्रपूर हादरले:माहेरी सुटीसाठी आलेल्या विवाहितेची गळा चिरून निर्घृण हत्या, धोपटाळा वसाहतीमधील घटना

0
new-project-2026-05-30t140137144_1780129973.jpg




उन्हाळ्याच्या सुटी घालवण्यासाठी आपल्या माहेरी आलेल्या एका 36 वर्षीय विवाहित महिलेची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील ‘वेकोलि’च्या धोपटाळा कामगार वसाहतीत हा थरार घडला. शितल रणधीर कुंभारे असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शितल कुंभारे या काही दिवसांपूर्वीच आपल्या लहान मुलीसह धोपटाळा टाऊनशिपमधील क्वॉर्टर क्रमांक 52/2 येथे माहेरी आल्या होत्या. घटनेच्या रात्री शितल यांची आई आणि भाऊ देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरात केवळ शितल आणि त्यांची लहान मुलगी अशा दोघीच होत्या. रात्रीच्या वेळी शितल यांची मुलगी दुसऱ्या खोलीत झोपलेली असताना अज्ञात मारेकऱ्याने घरात प्रवेश केला. आरोपीने गाढ झोपेत असलेल्या शितल यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले आणि त्यानंतर गळा चिरला. या अत्यंत क्रूर हल्ल्यात प्रचंड रक्तस्राव झाल्याने शितल यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी मुलगी उठल्यावर प्रकार उघडकीस सकाळी जेव्हा लहान मुलगी जागी झाली, तेव्हा तिला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांकडून तपास सुरू राजुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. राजुरा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्या कौटुंबिक वादातून झाली की वैयक्तिक वैमनस्यातून, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना झाली आहेत. राजुरा पोलिस निरीक्षक आसिफ रजा यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. गोविंदपूरमध्ये 6 जणांना गोळ्या घातल्या दुसरीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चडचण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भीमा नदीकाठावर असलेल्या गोविंदपूर (जि. विजयपूर) गावात शुक्रवारी दुपारी भीषण हत्याकांड घडले. यामध्ये सहा जणांची हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी शेतात येऊन आधी गोळीबार केला आणि नंतर शस्त्रांनी वार केले. मृतांपैकी पाच जण चडचणमधील एकाच कुटुंबातील आहेत, तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे (65), शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे (58), चंद्रकांत उर्फ चंदू रेवणसिद्धप्पा निराळे (55), राहुल शिवपुत्र निराळे (25), समर्थ शिवपुत्र निराळे (23, सर्व रा. चडचण, जि. विजयपूर) आणि शब्बीर बाबूसाब अत्तार (45, रा. चडचण) अशी मृतांची नावे आहेत. तर, अरविंद यशवंत कटगे (72, रा. दसूर) व जेसीबी चालक संदीप भारत माने (34, रा. कात्राळ, ता. मंगळवेढा)हे दोघे जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास निराळे कुटुंबाने गोविंदपूरमध्ये घेतलेल्या शेतात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून सीमाभागातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच विजयपूर व चडचण पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाला असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके तयार केली. मृतदेह व जखमींना विजयपूर येथील बीएलडीई रुग्णालयात हलवले. जुन्या वैमनस्यातून हत्याकांड? गोविंदपूर गावात निराळे आणि गुळगी कुटुंबांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीच्या वादावरून संघर्ष सुरू होता. 2015 मध्ये झालेल्या खून प्रकरणातील वैमनस्यातून शुक्रवारचे हत्याकांड घडले असावे, असा पोलिसांना प्राथमिक संशय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed