विधान परिषदेसाठी महायुतीत रस्सीखेच:जळगावात गुलाबराव पाटील मुलासाठी प्रयत्नशील, कोकणात आमदार दळवींच्या मुलीने भरला अर्ज

0
image-resize-color-correction-and-ai-2026-05-30t14_1780130952.png




विधान परिषदेच्या 17जागांसाठी पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांत उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. जळगावची जागा भाजपला सुटल्याचे स्पष्ट होताच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आपल्या मुलासाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात तातडीने मुंबईला दाखल झाले. कोकणातील एकमेव जागेवरूनही शिवसेनेतच संघर्ष पेटला आहे. येथे आमदार भरत गोगावले आणि महेंद्र दळवी हे दोन्ही नेते आपापल्या मुलांसाठी तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोलापुरातही भाजपचे शहाजी पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने तेथेही रणकंदन माजण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी पुढील महिन्यात 18 तारखेला निवडणूक होणार आहे. महायुतीच्या घटकपक्षांत सध्या कोणती जागा कोण लढवणार? याविषयी चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप 17 पैकी सर्वाधिक 11 जागा लढवणार असून, उर्वरित 6 जागांपैकी 4 जागा शिवसेना, तर 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवण्याची शक्यता आहे. पण त्यावर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब झाले नाही. यामुळे महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची उमेदवारीसाठीची धडपड अधिकच तीव्र बनली आहे. या प्रकारामुळे पक्षश्रेष्ठींवरील दबावही वाढत चालला आहे. कोकणातील एका जागेसाठी सेनेच्या 2 आमदारांत स्पर्धा विधानपरिषदेच्या कोकणातील एकमेव जागेसाठी सध्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले व आमदार महेंद्र दळवी यांच्यात स्पर्धा लागली आहे. मंत्री गोगावले हे आपले सुपुत्र विकास गोगावले यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर आमदार महेंद्र दळवी हे आपल्या कन्या जुईली दळवी (जुईकर) यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत. पैकी जुईली यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे भरत गोगावले व त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे. या मतदारसंघात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अनिकेत सुनील तटकरेही मैदानात उतरण्याची शक्यता आहे. पण अद्याप त्याची पुष्टी झाली नाही. पण तूर्त तरी येथे महायुतीमध्येच उमेदवारीसाठी चढाओढ लागल्याचे चित्र आहे. जळगावात गुलाबराव पाटील मुलासाठी प्रयत्नशील दुसरीकडे, जळगाव विधान परिषदेची जागा भाजपला सुटल्याच्या बातमीनंतर मंत्री गुलाबराव पाटील तातडीने जळगावहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. ते मुंबईत शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. जळगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच सुटावी असा त्यांचा आग्रह आहे. गुलाबराव पाटील स्वतः आपले चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्या उमेदवारीसाठी पाठपुरावा करत आहेत. पण भाजपने या जागेवर दावा केल्यामुळे येथेही महायुतीत मोठी रस्सीखेच दिसून येत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील यांनी शुक्रवारीच उमेदवारी अर्ज घेतला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधीच गुलाबराव पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे मुंबईत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व आमदारांच्या शिष्टमंडळाने एकनाथ शिंदे यांची भेट घेत जागा द्यावी अथवा मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. उद्या सायंकाळपर्यंत जळगाव विधान परिषदेच्या जागेबद्दल निर्णय होऊन अधिकृत घोषणेची शक्यता. सोलापुरात भाजपकडून शहाजी पवारांचे नाव चर्चेत दुसरीकडे, सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पक्षाने अद्याप येथे कुणालाही उमेदवारी जाहीर केली नाही. पण प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य शहाजी पवार यांच्या उमेदवारीचे संकेत त्यांचे बंधू तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या मोबाईल स्टेटसवरून मिळत आहे. त्यामुळे शहाजी पवार यांना भाजपची उमेदवार जाहीर होणार का? याची उत्सुकता लागली आहे. सोलापूरच्या जागेसाठी माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राम सातपुते, राजन पाटील, दिलीप माने, प्रदेश कार्यकरिणी सदस्य शहाजी पवार, रोहन देशमुख, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. या सर्वांमध्ये परिचारक यांचे पारडे जड मानले जात आहे. पण भाजपचे धक्कातंत्र पाहता पक्षाकडून ऐनवेळी कोणतेही नाव जाहीर होऊ शकते. त्यामुळे शहाजी पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed