पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाकडून कुंटूर येथे गुटखा जप्त
अवैध व्यवसाय विरोधी मोहीमेत आणखी (44) गुन्हे दाखल, (61) इसमांविरुद्ध कारवाई
नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 1 ते 31 मे, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेच्या 15 व्या दिवशी, पोलीस उप महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखालील पथकाने, नांदेड जिल्ह्यातील कुंटूर पोलीस ठाणे हद्दीत साठवणूक केलेला 2,47,009/- रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. यातील आरोपींविरुद्ध कलम 123 भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास दहा वर्षाच्या कारावासासह द्रव्य दंडाची देखील शिक्षा आहे.त्याचबरोबर, मटका-जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या एकूण (10) इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत (6) गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून 45,270/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासोबतच, अवैध दारू विक्री करणाऱ्या (27) इसमांविरुद्ध (24) गुन्हे दाखल करून, त्यांच्याकडून 90,050/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्धही (2) गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून 46,11,802/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपरोक्त कारवाई सोबतच, शस्त्र अधिनियमान्वये (3), कोटपा अन्वये (2), तर इतर अधिनियमाखाली मिळून, एकूण (44) कारवाया करण्यात आल्या असून, यात निष्पन्न झालेल्या आरोपीतांकडून एकूण 65,71,426/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खबर हेल्पलाइनला नागरिकांचा प्रतिसाद : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना देता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइनला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
Post Views: 291
