सोलापुरात सीसीटीव्हीवर कापड टाकून दोरखंडाने एटीएम मशीन ओढले:गाडीत घालून नेले, हैदराबाद रस्त्यावरील सग्गम नगर रस्त्यावर पहाटे तीनची घटना

0
new-project-2026-05-17t090927690_1778989222.jpg




जुना विडी घरकुल पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सग्गम नगरातील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन दोर बांधून कारने बाहेर ओढले. त्यानंतर 300 किलो वजनाचे हे मशीन घेऊन पसार झाल्याची घटना घडली. शुक्रवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली. मशीन फोडत असल्याची माहिती बँकेच्या नियंत्रण कक्षाला मिळताच, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रमोद वाघमारे यांना फोन केला. त्यानंतर पोलिस तातडीने एटीएम मशीनजवळ पोहोचले; तोपर्यंत चोर मशीनसह पसार झाले होते. शुक्रवारी दुपारीच या मशीनमध्ये 10 लाख रुपयांच्या नोटा भरण्यात आल्या. मध्यरात्रीनंतर ही चोरी झाली. त्यात अंदाजे आठ ते नऊ लाख रुपये असतील, असे सांगण्यात आले. चोरीची फिर्याद देण्यासाठी मुंबईहून बँकेचे प्रतिनिधी येणार असल्याने घटना घडल्यानंतर 12 तासांनीही गुन्हा दाखल झाला नाही. सग्गम नगरात पाच बाय सहाच्या गाळ्यामध्ये हे मशीन होते. बाहेर एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे, ज्याचे नियंत्रण बँकेच्या नियंत्रण कक्षात होते. चोरी करण्यापूर्वी चोरांनी रेकी केली. मध्यरात्री चोरीचा बेत आखला. त्यानुसार मशीन उचकटले. दोरखंड बांधून कारच्या साहाय्याने ओढले. त्यानंतर कारमध्ये घालून पसार झाले. वेळ गेल्याने चोर पळाले अलर्ट सिस्टीम पोलिस ठाण्यात का नाही वाजली? : सीसीटीव्ही बंद झाल्यानंतर मशीनशी छेडछाड सुरू होताच बँकेच्या नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. त्यासरशी संबंधित पोलिस ठाण्यालाही आपोआप फोन जाणे अपेक्षित होते. तो का आणि कसा गेला नाही? पोलिस चौकी जवळ असूनही चोरी कशी झाली? घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावरील संभाजीराव शिंदे शाळेजवळ विडी घरकुल पोलिस चौकी आहे. तेथे पोलिस असतातच वेळीच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असती तर चोर सापडले असते. गस्त घालणाऱ्या पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला अर्धातास लागल्यानेच चोर पसार झाले. घटना घडून 12 तास उलटले तरी बँकेचे अधिकारी का आले नाहीत? चोरीची घटना सुरू असतानाच त्याची खबर बँकेच्या नियंत्रण कक्षात पोहोचली. परंतु पोलिसांत तक्रार देण्यासाठी अधिकारी आलेच नाहीत. १२ तास उलटूनही पोलिसांत नोंद नाही. चोरी कैद होऊ नये म्हणून चोरांनी कॅमेऱ्यावर कापड टाकले आणि रेकॉर्डिंग बंद झाले. याची माहिती बँकेच्या नियंत्रण कक्षात मिळाली. त्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याचा नंबर शोधून पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांना बँकेतून फोन आला. त्यांना एटीएम मशीनचे लोकेशन आणि पत्ता देण्यात आला. मात्र, गस्त घालणारे पोलिस येईपर्यंत चोर एटीएम मशीन घेऊन पसार झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात काहीही कैद झाले नसल्याचे दिसून आले. मात्र वाहनाच्या टायर तिथे रूतलेले दिसले. त्याचा क्रमांक मिळाला. त्या दिशेने तपास सुरू असल्याचे पोलिस म्हणाले. दोर बांधून मशीन नेले, तपासासाठी चार पथके बँकेच्या अधिकाऱ्यांचा फोन आल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र चोर एटीएम मशीनसह पळून गेले होते. त्यांचे वाहन ज्या दिशेने गेले, त्याच्या आधारे आम्ही गुन्ह्याचा तपास करत आहोत. चार पथके तयार करून शोध घेतला जात आहे. लवकरच त्यांचे धागेदोरे हाती सापडतील. त्यानंतर त्यांच्या मुसक्या आवळण्यात येतील. प्रमोद वाघमारे, पोलिस निरीक्षक, एमआयडीसी पोलिस ठाणे जळगावात अशाच प्रकारची घटना, आंतरराज्य टोळी..? मागील माहिन्यातील 3 एप्रिलला जळगावच्या पोलन पेठेतही अशाच प्रकारची घटना घडली होती. एक्विटास स्मॉल बँकेचे एटीएम मशीन अशाच पद्धतीने दोरखंडाने ओढून चोर पसार झाले होते. त्यावरून आंतरराज्य टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येते. दुपारच्या दरम्यान रेकी करणे आणि मध्यरात्रीनंतर वाहन घेऊन एटीएमसमोर थांबणे. त्याचा खालचा भाग गॅस कटरने कापणे, वाहनाच्या साह्याने दोरखंडाने ओढणे हीच चोरीची पद्धत आहे. ही टोळी सापडल्यानंतर बऱ्याच ठिकाणच्या मशीन चोरीचा उलगडा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed