नीट पेपरफुटीचे धागेदोरे आता नांदेडमध्ये; सीबीआयची ८ तास झाडाझडती
नांदेड | प्रतिनिधी
देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत असून, केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) शनिवारी नांदेड शहरातील विद्युतनगर परिसरात मोठी कारवाई केली. सीबीआयच्या विशेष पथकाने कदम कुटुंबीयांच्या निवासस्थानी तब्बल आठ तास झाडाझडती घेत सखोल चौकशी केली. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, कदम यांनी आपल्या मुलीसाठी नीट परीक्षेचा प्रश्नपत्रिका संच सुमारे पाच लाख रुपयांत विकत घेतल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी सीबीआयचे अधिकारी विद्युतनगर येथील त्यांच्या फ्लॅटवर दाखल झाले. यावेळी घरातील विविध कागदपत्रे, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित दस्तऐवजांची बारकाईने तपासणी करण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान सीबीआयने पेपर नेमका कुठून मिळाला, संपर्क कोणामार्फत झाला, व्यवहार कधी आणि कुठे झाला यासंदर्भात अनेक प्रश्न विचारले. तपास पथकाने कुटुंबातील प्रत्येक सदस्याची स्वतंत्र चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शुक्रवारी लातूर येथे मोटेगावकर या नामांकित कोचिंग क्लास चालकाची चौकशी केल्यानंतर सीबीआयचे पथक थेट नांदेडमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे पुणे–लातूर–नांदेड असा संभाव्य नेटवर्क तपास यंत्रणेसमोर उलगडत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणात पुढील चौकशीसाठी कदम कुटुंबीयांना पुणे येथे हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आगामी काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून, या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी तपास यंत्रणांकडून कसून प्रयत्न सुरू आहेत.
