8500 उमेदवारांनी दिली SRPF ची लेखी परीक्षा:4 परीक्षा केंद्रांवर शांततेत परीक्षा, पण बॅगा ठेवण्याची सोय नसल्याने परीक्षार्थींची धावपळ
![]()
राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 20 वरणगाव यांच्यामार्फत रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे सशस्त्र पोलिस शिपाई भरती 2024-25 अंतर्गत लेखी परीक्षा घेण्यात आली. तब्बल 8500 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. पण परीक्षा केंद्रांवर उमेदवारांनी आणलेले साहित्य ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे त्यांना आपल्या बॅगा परीक्षा केंद्राबाहेर उघड्यावर ठेवाव्या लागल्या काही बॅगा झाडांवर अडकवलेल्याही दिसून आल्या. राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक २०, वरणगाव यांच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), बीड बायपास रोड येथील गेट क्रमांक 1, 3, 5 व 8, सातारा तांडा, रेणुका माता मंदिर रोड सातारा परिसर येथे सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत ही परीक्षा झाली. या परीक्षेसाठी उमेदवार सकाळी 7 वा. परीक्षा केंद्रावर हजर झाले होते. परीक्षा केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पण उमेदवारांनी आणलेले साहित्य ठेवण्याची कोणतीही तजवीज नव्हती. अनेक उमेदवार बाहेर गावांवरून आले होते. त्यामुळे त्यांच्यापुढे आपल्यासोबतच्या बॅगा कुठे ठेवायच्या हा प्रश्न होता. अखेर त्यांनी परीक्षा केंद्राबाहेर असणाऱ्या झाडांखाली व झाडांवरच अडकवून आपल्या बॅगा ठेवणे पसंत केले. याचे काही फोटो व व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात परीक्षा केंद्रावर ठिकठिकाणी बॅगा पडलेल्या दिसून येत आहे.
