वाळू तस्कराची महसूलसह पोलिसांना शिवीगाळ:पोलिसी खाक्या दाखवताच उतरली झिंग; माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल
![]()
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव चौफुली भागात मध्यरात्रीच्या सुमारास वाळूचे टिप्पर पकडल्यानंतर महसूल व पोलिस अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या वाशिमच्या वाळू तस्कराची पोलिसांनी झिंग उतरवली. आपली चूक झाल्याची उपरती झाल्यानंतर त्याने माफी मागितली अन् त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. विदर्भातील वाशिम भागातून एका टिप्परमधून गुरुवारी ता. १४ मध्यरात्री उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे व पथकाने गोरेगाव ते सेनगाव रोडवरील गोरेगाव चौफुलीवर त्यांनी एक टिप्पर थांबवून चालक समाधान राऊत (रा. तोंडगाव, जि. वाशिम) याची चौकशी केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे सदर वाळू अवैध असल्याने उपविभागीय अधिकारी घुटुकडे यांनी टिप्पर गोरेगाव पोलिस ठाण्यात आणण्याच्या सूचना दिल्या. यावेळी एका बोलोरो जीपमधून आलेल्या संजय गोरे (रा. तोंडगाव, जि. वाशीम) याने त्या ठिकाणी येऊन टिप्पर समोरच जीप उभी केली अन टिप्पर नेण्यास मज्जाव केला तसेच चालक राऊत यास पळवून लावले. यावेळी त्याने गोंधळ घालून उपविभागीय अधिकारी घुटुकडे यांना जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र त्याच्या धमकीला भिक न घालता घुटुकडे यांनी तातडीने गोरेगाव पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर गोरेगाव पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता संजय याने पोलिस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली तसेच आर्थिक देवाण घेवाणीचे आरोपही लावले. टिप्पर पेटवून देण्याची धमकीही दिली. मात्र यावेळी पोलिसांनी नमते घेत त्याला गोड बोलून ताब्यात घेतले अन पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर फरार झालेल्या टिप्पर चालक समाधान राऊत यालाही ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा चांगलाच पाहूणचार केला. त्यानंतर संजय याला उपरती झाली अन त्याची चुक कळली. त्याने लगेचच व्हिडीओ तयार करून महसूल अधिकारी व पोलिसांची माफी मागितली. सदर व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला आहे.
