सातारा गुन्हेगारी वार्ता:विवाहितेवर जबरदस्तीचा प्रयत्न, मुलांनाही मारहाण; गुन्हा दाखल

[ads1]


शिवथर परिसरात घरात घुसून २९ वर्षीय विवाहितेवर जबरदस्ती केल्याचा आरोप करत एका तरुणाविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराला विरोध केल्यानंतर संबंधित महिलेला तसेच तिच्या मुलांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याशिवाय घटनेची माहिती पतीला दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुशांत शुक्राचार्य साबळे (रा. शिवथर) याने महिलेच्या घरात प्रवेश करून तिच्यावर जबरदस्ती केली. महिलेने विरोध केल्यानंतर त्याने शिवीगाळ व मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी तिच्या मुलांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. घटनेनंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार साबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत. कोंडवेत दोन दुचाकींची धडक; जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू कोंडवे येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. ऋतुजा वसंत घोरपडे (वय २२) यांनी कोंडवे येथे रस्त्याच्या बाजूला दुचाकी थांबवून स्कार्फ बांधत होत्या. त्याचवेळी संजय यादव चोरगे (वय ५५, रा. चोरगेवाडी) हे दुचाकीवरून भरधाव वेगाने आले. नियंत्रण सुटल्याने त्यांच्या वाहनाची घोरपडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. अपघातात ऋतुजा घोरपडे किरकोळ जखमी झाल्या. मात्र संजय चोरगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ऋतुजा घोरपडे यांच्या फिर्यादीवरून सातारा तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. नागठाण्यात डायव्हर्शनचा अंदाज चुकला; काँक्रीट ब्लॉकला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नागठाणे हद्दीत डायव्हर्शनसाठी ठेवलेल्या काँक्रीट ब्लॉकला दुचाकी धडकल्याने मागे बसलेल्या ५१ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात २९ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास झाला. गणेश दत्तात्रय चव्हाण (रा. लोणी, ता. खंडाळा) हे दुचाकीवरून कराडहून साताऱ्याकडे येत होते. त्यांच्या मागे गणेश एकनाथ गाढवे (वय ५१, रा. खंडाळा) बसले होते. नागठाणे परिसरात महामार्गावरील डायव्हर्शनचा अंदाज न आल्याने दुचाकी काँक्रीट ब्लॉकवर आदळली. या दुर्घटनेत गाढवे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चव्हाण यांनाही दुखापत झाली. याप्रकरणी विनायक एकनाथ गाढवे यांच्या फिर्यादीवरून बोरगाव पोलिस ठाण्यात गणेश चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत. फ्लॅटमध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याचा आरोप; चौघांविरुद्ध गुन्हा गोकर्णनगर, खेड परिसरातील एका फ्लॅटमध्ये मालकी हक्क अथवा कायदेशीर अधिकार नसताना प्रवेश करून कुटुंबासह वास्तव्य केल्याच्या आरोपावरून चौघांविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. कृष्णाई वंदन येथील फ्लॅट क्रमांक ३०/२० मध्ये सागर विठ्ठल राक्षे, त्यांची आई, पत्नी आणि विठ्ठल राक्षे यांनी परवानगी अथवा कायदेशीर अधिकार नसताना प्रवेश केल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधितांनी तेथे कुटुंबासह वास्तव्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी विकासनगर येथील डॉ. सचिन सुरेश भोसले (वय ५०) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार सपकाळ करीत आहेत. काशीळ सर्व्हिस रोडवर तरुण ताब्यात; दुचाकी आणि मोबाईलच्या मालकीचा तपास काशीळ येथील महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर संशयास्पदरीत्या दुचाकी व मोबाईल घेऊन फिरणाऱ्या २८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडील वस्तू त्याच्या मालकीच्या नसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सव्वाबारा वाजता गांधीनगर ते काशीळ मार्गावरील सर्व्हिस रोडवर बशीर वली शेख (वय २८, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) हा दुचाकी आणि मोबाईलसह पोलिसांना आढळला. चौकशीदरम्यान संबंधित वस्तूंच्या मालकीबाबत समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस कॉन्स्टेबल धीरज महाडिक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी व मोबाईल आरोपीकडे कसे आले, याचा तपास सुरू आहे. पुढील तपास पोलीस नाईक कचरे करीत आहेत.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *