काम पूर्ण होण्यापूर्वी कंत्राटदारांना बिल दिल्यास कारवाईचा इशारा:लोहाऱ्यात जलजीवन योजनेच्या बिलांवर अध्यक्षा अर्चना पाटील यांचा इशारा
![]()
जलजीवन योजनेचे काम पूर्ण होण्यापूर्वी कंत्राटदाराला बिल अदा केले तर मी संबंधितांवर कारवाई करेन, अशी ताकीद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली. लोहारा येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. ७) आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पाणीपुरवठा योजना, घरकुल, महावितरण, रोजगार हमी योजना यासह तालुक्यातील विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा उषा गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी, पंचायत समितीच्या सभापती पल्लवी जानकर, उपसभापती अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्या श्रुती पनुरे, रोहिणी कोकणे, युवासेना लोकसभा प्रमुख आनंद पाटील, पंचायत समिती सदस्य प्रगती घोटाळे, मालन कांबळे, दत्तात्रय वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, एचपीव्ही लस सुरू करण्यात आली आहे. आशा कार्यकर्त्यांनी गावातील मुलींना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन ही लस द्यावी. तसेच तालुक्यातील सर्व गावांमध्ये आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्ड काढावीत, असे आवाहन त्यांनी केले. १८ वर्षांखालील मुलींचे विवाह होत असल्यास प्रशासनाने तात्काळ बालविवाह रोखावेत. असे प्रकार आढळल्यास टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले. या वेळी सोळा खेडी पाणीपुरवठा योजनेवर चर्चा झाली. मात्र संबंधित अधिकाऱ्यांना योग्य माहिती देता न आल्याने अध्यक्षा पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. “नागरिकांच्या अडचणी सोडवा,” अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. प्रास्ताविक गटविकास अधिकारी जगदेव वग्गे यांनी केले. लोहारा तालुक्याने जलतारा उपक्रमात चांगला सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, सहाय्यक प्रशासन अधिकारी नागनाथ कुंभार, शीतल पाटील, राहुल पाटील, मोहन पनुरे, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव जगताप यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, पंचायत समिती कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले तर आभार महादेव जगताप यांनी मानले. अंगणवाडी व शाळांना निधी उपलब्ध करून द्या तालुक्यातील १५० पैकी १४८ अंगणवाड्यांना वीजपुरवठा नसल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. शाळा व अंगणवाड्यांना वीज देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असल्याचे सांगत, या महिनाअखेरपर्यंत सर्व अंगणवाडी व शाळांना वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना त्यांनी केली. तालुक्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये टीव्ही उपलब्ध करून द्यावेत. तसेच वीज, पाणी आणि शोषखड्डा पूर्ण होईपर्यंत नवीन अंगणवाडी ताब्यात घेऊ नये, अशा सूचनाही त्यांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या. धोकादायक अवस्थेत असलेल्या अंगणवाड्यांच्या इमारती निर्लेखनाचा प्रस्ताव पाठवावा, असे आदेशही त्यांनी दिले.
