कर्जतमध्ये राजकीय भूकंप; राम शिंदे-रोहित पवार समर्थक एकत्र:नगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्याविरोधात 13 नगरसेवकांचा अविश्वास प्रस्ताव
![]()
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीत पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांच्या विरोधात 13 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. नगराध्यक्षांना पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी या प्रस्तावातून करण्यात आली आहे. नगरपंचायतीत एकूण 17 नगरसेवक असून त्यापैकी 13 जणांनी थेट नगराध्यक्षांविरोधात भूमिका घेतल्याने कर्जतच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण घडामोडीत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या समर्थक नगरसेवकांनी एकत्र आल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार झाल्याचे चित्र दिसत आहे. अविश्वास प्रस्तावामध्ये नगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्या कारभारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नगरपंचायतीचे कामकाज करताना कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. नगराध्यक्ष मनमानी पद्धतीने निर्णय घेतात, नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत आणि प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. नगरसेवकांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत वारंवार मागण्या करूनही त्या मुद्द्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. आरोग्य, दिवाबत्ती, शिक्षण, सांडपाणी व्यवस्थापन आणि इतर नागरी सुविधांबाबत नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र, नगराध्यक्षांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नगरपंचायतीतील असंतोष वाढत गेला आणि अखेर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, नगरपंचायतीतील गटनेतेपदावरूनही मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी प्रा. सतीश पाटील यांच्या निवडीला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे विद्यमान गटनेते आणि उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांना मोठा धक्का बसला आहे. सतीश पाटील यांनी नगरपंचायतीत सत्ता परिवर्तन घडवण्यासाठी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या बैठकीत गटनेते बदलाचा ठराव मंजूर करण्यात आला होता. या निर्णयाविरोधात संतोष मेहत्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दावा दाखल केला होता. सुनावणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, मेहत्रे यांना फक्त चार नगरसेवकांचा पाठिंबा दाखवता आला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मेहत्रे यांचे अपील फेटाळून लावत प्रा. सतीश पाटील यांच्याकडे गटनेतेपद कायम ठेवण्याचा निर्णय दिला. आता नगराध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर होणार का आणि कर्जत नगरपंचायतीत पुढे कोणते नवे राजकीय समीकरण तयार होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
