जय पवारांकडून 150 आमदारांची ताकद उभी होत असेल, तर शुभेच्छा:सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्री पदावरुन लक्ष्मण हाकेंचा टोला

0
3-photo-4_1778239934.png




ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबावर जोरदार टीका करत राज्याच्या राजकारणात नवी चर्चा निर्माण केली आहे. पवार कुटुंब सत्तेशिवाय राहू शकत नाही, असा आरोप करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांवर निशाणा साधला. एका बाजूला रोहित पवार विरोधी पक्षाची भूमिका घेत सरकारवर टीका करतात, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांचे कुटुंब सत्तेत सहभागी होऊन पदांचा लाभ घेत असल्याचा दावा हाके यांनी केला. हेच पवार कुटुंबाचे राजकारण असल्याचे ते म्हणाले. लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबाच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत विरोध आणि सत्ता हे दोन्ही एकाच वेळी चालवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका केली. राज्यात सामान्य कार्यकर्ते संघर्ष करत असताना काही नेते सत्तेच्या केंद्रस्थानी राहण्यासाठी वेगवेगळ्या भूमिका घेतात, असेही त्यांनी म्हटले. रोहित पवार सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत असले तरी दुसरीकडे अजित पवार यांचे कुटुंब सत्तेत महत्त्वाची पदे भूषवत असल्याने जनतेत संभ्रम निर्माण होत असल्याचे हाके यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरूनही टोला लगावला. महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्यासाठी 288 पैकी किमान 150 हून अधिक आमदारांची गरज असते. इतकी राजकीय ताकद उभी करणे सोपे नाही, असे ते म्हणाले. शरद पवार आणि अजित पवार यांसारख्या अनुभवी नेत्यांनाही ते पूर्णपणे साध्य झाले नाही, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे जय पवार यांच्या वक्तव्यावर भाष्य केले. जय पवार यांच्याबाबत बोलताना लक्ष्मण हाके यांनी उपरोधिक शैलीत प्रतिक्रिया दिली. जर जय पवारांना ते शक्य होत असेल, तर त्यांना माझ्या शुभेच्छा, असे म्हणत त्यांनी राजकीय टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पवार कुटुंबावर करण्यात आलेल्या या टीकेमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नेमके काय म्हणाले होते जय पवार सर्वच बारामतीकरांची इच्छा होती की, दादांना एकदा मुख्यमंत्री पहायचे आहे. आता वहिनी देखील खूप कष्ट घेत आहेत, मला वाटते 2029 ला बारामतीतून विधानसभेला वहिनीच उभ्या राहतील आणि आमची सर्वांची आशा आहे की, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे, असे विधान पवार यांनी केले आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे ही बारामतीकरांसह राज्यातील असंख्य कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा होती, मात्र त्यांच्या आकस्मिक निधनामुळे हे स्वप्न अधुरे राहिले. आता सुनेत्रा पवार मुख्यमंत्री बनून दादांची ही इच्छा पूर्ण करतील, अशी आशा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाळगत आहेत, असेही जय पवार यांनी म्हटले आहे. 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार या बारामतीच्या उमेदवार असतील असे स्पष्ट करतानाच, त्यांनी थेट मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केल्याने कार्यकर्त्यांच्या अपेक्षांना आता नवे बळ मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed