अंजनगाव बारीत घरांचे नुकसान; वीज वाहिन्या तुटून पुरवठा खंडीत:अचानक बदललेल्या वातावरणामुळे उभ्या कांदा पिकांचे मोठे नुकसान

0
transfar_240_177816355369fc9f61ab921_garpitanjangao.jpg




अंजनगाव बारी परिसरात दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात काळे ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट झाली. अचानक झालेल्या या अवकाळी बदलामुळे परिसरातील शेतकऱ्यांची धावपळ उडाली. विशेषतः शेतात उभ्या असलेल्या कांदा पिकांना मोठा फटका बसला असून गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी कांदा पिके आडवी पडली असून गारांच्या मारामुळे पिकांची गुणवत्ता खराब होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मोर्शी शहरातही दु. ३.३० वाजताच्या सुमारास आकाशात काळे ढग भरून आले व काही वेळाने सोसाट्याचा वारा वाहायला लागला. त्यानंतर काही वेळाने हलका पाऊस झाला. मात्र, कोणतेही नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती येथील स्थानिक प्रशासनाने दिली आहे. अंजनगाव बारी येथे मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला असून काही ठिकाणी वीज वाहिन्या तुटल्याच्या देखील तक्रारी समोर येत आहेत. असून रस्त्यावर विद्युत वाहिन्या विखुरलेल्या दिसत होत्या. तसेच जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यावर काही झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून वीज वाहिन्यांवर कोसळल्याने संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा पूर्णत: खंडित झाला. परिणामी ऐन उन्हाळ्यात नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून रस्त्यांवर चालताना अडथळा होत आहे. अवकाळी पावसामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अमरावती व मोर्शी तालुक्यांमध्ये गुरुवार ७ रोजी दुपारी हलक्या वादळी पावसाने हजेरी लावल्यामुळे तसेच अंजनगाव बारीत गारपीट झाल्यामुळे कमाल तापमान ३९.४ अंशापर्यंत खाली आले. २४ तासांत तापमानात १.८ अंश सेल्सियसने घट झाली. त्याचप्रमाणे किमान तापमानही २५.१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. २४ तासात किमान तापमानातही १ अंश सेल्सियसने घट झाली. त्यामुळे जिल्हाव सीयांना प्रचंड उकाड्यापासून दिलासा मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed