एसटी बस – स्कॉर्पिओची समोरासमोर धडक:4 जण जागीच ठार, 4 जखमी; मुरबाड – माळशेज घाट मार्गावरील वैशाखरे येथील घटना
![]()
एसटी बस आणि स्कॉर्पिओच्या समोरासमोर झालेल्या एका धडकेत 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी मुरबाड – माळशेज घाट मार्गावरील वैशाखरे वळणावर घडली आहे. या घटनेत इतर 4 जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी आगारातील एक बस मंगळवारी सकाळी 8.30 च्या सुमारास कल्याणहून अहिल्यानगरच्या दिशेने निघाली होती. ही बस मुरबाड तालुक्यातील टोकावडे – वैशाखरे हद्दीत पोहोचली असता तिची विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओसोबत जोरदार धडक झाली. त्यात स्कॉर्पिओमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 4 जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये 2 मुलांचा समावेश आहे. त्यांच्यावर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत व बचावकार्य सुरू केले. कल्याण – अहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे वळणाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नांत हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातात दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच मृतदेह पुढील सोपस्कारासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. पांजरा पुलावर काही दिवसांपूर्वीच गेला होता 11 जणांचा बळी उल्लेखनीय बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच कल्याणजवळ एक भीषण अपघात झाला होता. कल्याण- मुरबाड मार्गावरील पांजरा पुलावर इको कार व सिमेंट मिक्सर ट्रकमध्ये झालेल्या या भीषण अपघातात तब्बल 11 जणांचा बळी गेला होता. इको गाडीमधून मुरबाडमधील काही रहिवाशी कल्याणच्या दिशेला जात असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये काळी-पिवळी चालवणाऱ्या चालकासहीत गाडीतील सर्वांचा जागीच मृत्यू झाला. त्यात काही महिलांचाही समावेश होता. मार्गावरील धोकादायक वळणांमुळे अपघात कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर अनेकदा असे मोठे अपघात घडतात. या मार्गावरुन भाजीपाल्याचे पिकअप, ट्रक व बसची वर्दळ मोठ्या प्रमाणावर आहे. याशिवाय या मार्गावर काही ठिकाणी अरुंद व तीव्र वळणेही आहेत. या ठिकाणी ओव्हरटेक करताना किंवा वेगाने वाहने चालवताना अपघात होतात. गत 26 जानेवारी रोजी जुन्नरमधील आणे येथे पिकअप आणि बोलरोचा भीषण अपघात झाला होता. त्यात 1 जण ठार, तर 9 जण गंभीर जखमी झाले होते. तत्पूर्वी, 12 फेब्रुवारी रोजी ओतूरमध्ये शाळेच्या एसटी बसचा अपघात झाला होता. त्यात 15 विद्यार्थी जखमी झाले होते.
