सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय:यंदापासूनच प्रवेश सुरू; श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-05t16_1777980435.png




सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्लाय सुरु करण्यास व त्यासाठी सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तरावरचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे नाव यापुढे शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँण्ड टेक्नॉलॉजी), सोलापूर असे करण्यास देखील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. सरकारच्या निर्णयामुळे सोलापूर आणि आजुबाजुच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरूंच्या दृष्टीने महत्वांचे अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. या अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता प्रत्येकी साठ अशी असेल. एआय अँण्ड मशिन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन असे हे तीन नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६ – २७) पासून उपलब्ध असणार आहेत. यामुळे या परिसरात सुमारे १८० विद्यार्थ्यांना या नव्या शैक्षणिक वर्षापासून सोलापूरमध्येच अभियांत्रिकीला प्रवेश घेता येणार आहे. या नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापनेकरिता टप्पाटप्प्याने नव्याने नियमित शिक्षकांची ३९ पदे, शिक्षकेतर ३८ (यापैकी २२ नियमित व १६ बाह्ययंत्रणेद्वारे) पदे अशी पदनिर्मिती करण्यात येणार आहे. संस्थेच्या नवीन शिक्षक व शिक्षक पदावरील तसेच बांधकाम, यंत्रसामुग्री – उपकरणांकरिता अशा आगामी चार वर्षांतील सुमारे १५७ कोटी ६६ लाख दोन हजार रुपयांच्या खर्चाच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली आहे. तसेच या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकीचे हे तीन पदवी अभ्यासक्रम सुरु होणार असल्याने इमारत दुरूस्ती, डागडुजी तसेच अन्य आवश्यक खर्चाकरिता म्हणून ११ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय सरकारकडे हस्तांतरीत दुसरीकडे, धाराशिवच्या तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत चालविण्यात येणारे श्री. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने आज हातावेगळा केला. संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी संस्थांनामार्फत चालविले जाणारे श्री. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित करण्याबाबत प्रस्ताव दिला होता. त्यावर उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पाच सदस्यीय समितीने या महाविद्यालयाच्या हस्तांतरणाबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून सादर केला. त्यानुसार महाविद्यालयाची जागा, इमारत आणि साहित्यासह शासनाकडे हस्तांतरित करण्यास आज मान्यता देण्यात आली. आता हे महाविद्यालय श्री. तुळजाभवानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर, या नावाने ओळखले जाईल. सध्या या महाविद्यालयात सिव्हील (स्थापत्य) मेकॅनिकल (यंत्र अभियांत्रिकी), इलेक्टॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन (अणुविद्युत व दूरसंचार) आणि कॉम्प्युटर सायन्स (संगणक विज्ञान) असे अभ्यासक्रम सुरू आहेत. या निर्णयामुळे महाविद्यालयाचे सक्षमीकरण होऊन या परिसरात अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध होण्याने या परिसरातील होतकरूंना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण मिळणे सुलभ होणार आहे. भविष्यात या महाविद्यालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, ग्रीन टेक्नॉलॉजी, रिन्युएबल एनर्जी, ईव्ही टेक्नॉलॉजी असे आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरु करता येणार आहेत. यादृष्टीने महाविद्यालयासाठी नियमित शिक्षकांची ६० पदे आणि शिक्षकेतर पदे ५८ अशा एकूण ११८ पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली. मात्र सध्या महाविद्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी संस्थांनाचेच कर्मचारी म्हणून राहतील. संस्थांनाची पदे जशी रिक्त होत जातील तशी ती पदे शासनाच्या विहीत पध्दतीने भरती करण्यास आणि त्यापोटी येणाऱ्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed