पुण्यातील पाणीकपात 31 मेपर्यंत रद्द:महापौर मंजुषा नागपुरे यांचे निर्देश, मान्सूनपूर्व पाणीपुरवठा आढावा बैठकीत निर्णय
![]()
पुणे महानगरपालिका हद्दीतील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मंगळवारी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. या बैठकीत महापौरांनी ३१ मेपर्यंत पाणीकपात रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार यंदा ९२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या पुणे शहराला दररोज १५६० एमएलडी पाण्याची गरज आहे, तर धरणांमध्ये १०.२६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यापूर्वी जलसंपदा विभागाने ३१ ऑगस्टपर्यंत पाणीकपात करण्याचे निर्देश दिले होते. एक दिवसाआड पाणीकपात केल्यास ०.५ टीएमसी पाणी वाचू शकते, असेही बैठकीत नमूद करण्यात आले. तसेच, नव्याने समाविष्ट झालेल्या गावांसाठी १.६० टीएमसी अतिरिक्त पाण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे यापूर्वीच करण्यात आली आहे. बैठकीत शहरातील विद्यमान पाणीसाठा, जलशुद्धीकरण व्यवस्था, वितरण प्रणाली आणि संभाव्य पाणीटंचाईवरील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. पुणे शहराला पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या धरणांमधून पाणीपुरवठा होतो. हवामान विभागाच्या कमी पावसाच्या अंदाजानुसार आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाण्याच्या गुणवत्तेबाबत पर्वती जलकेंद्र प्रयोगशाळेत दरमहा अनेक नमुन्यांची तपासणी केली जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक तत्त्वांनुसार पाण्याची गुणवत्ता राखली जात आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये क्लोरीनेशन प्रक्रिया सक्षम ठेवण्यात आली असून, आवश्यक रसायनांचा (पीएसी व क्लोरीन) पुरेसा साठा उपलब्ध आहे. शहरातील १७ जलशुद्धीकरण प्रकल्पांची देखभाल, क्लेरीफायर व फिल्टर बेडची स्वच्छता तसेच यंत्रणांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. पावसाळ्यात वाढणाऱ्या गढूळपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाणी शुद्धीकरण प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जुन्या हद्दीसोबतच नव्याने समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. यामध्ये जलशुद्धीकरण केंद्रे, पंपिंग स्टेशन, पाण्याच्या टाक्या आणि वितरण लाईन उभारण्यात येणार आहेत. पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी एआय आधारित लीक डिटेक्शन, रोबोटिक कॅमेरा तपासणी, वाहन ट्रॅकिंग प्रणाली आणि मोबाईल ॲपद्वारे नियंत्रण यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. बैठकीत कनिष्ठ अभियंते, तांत्रिक कर्मचारी आणि मीटर रीडर्स यांच्या रिक्त पदांची तातडीने पूर्तता करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. महापौरांनी प्रशासनाला निर्देश दिले की, ३१ मेपर्यंत पाणीकपात रद्द करून नागरिकांना अखंड, स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करावा. सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करावी. आगामी मान्सून काळात कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्यावर विशेष भर देण्यात आला.
