'गिरा तो भी मेरी टांग उपर':गिरीश महाजन यांचा संजय राऊतांना खोचक टोला, विरोधकांवरही डागली टीकेची तोफ

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-05t162811422_1777978738.jpg




भाजपचे संकटमोचक आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांवर, विशेषतः संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला आहे. पश्चिम बंगालमधील भाजपच्या कामगिरीचे कौतुक करताना त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या परिश्रमाचा दाखला दिला. यावेळी महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, राऊतांची अवस्था ‘गिरा तो भी मेरी टांग उपर’ अशी झाली असून त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे. गिरीश महाजन म्हणाले, आमच्या नेत्यांनी तिथे परिश्रम घेतले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी तिथे अनेक सभा घेतल्या, अमित शहा यांनी सभा घेतल्या. कॉंग्रेस कुठे फिरले आहे? शिवसेना उबाठा बद्दल बोलायलाच नको, त्यांचे फळ त्यांना मिळाले आहेत, अशी टीका महाजन यांनी केली आहे. तर जयंत पाटील यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयाचे कौतुक केले आहे, त्यावर महाजन म्हणाले, जयंत पाटील खरं बोलत आहेत. प्रत्येकाच्या मनात आहे. विरोधक असले तरी त्यांना माहीत आहे की आम्ही किती परिश्रम घेतले आहेत. हा ऐतिहासिक विजय आहे. पण संजय राऊत यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे, ‘गिरा तो भी मेरी टांग उपर’, असे म्हणत टोला लगावला आहे. संजय राऊत घरात बसून वायफळ बडबड करतात पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, संजय राऊत आम्हाला म्हणतात यांनी 365 दिवस यांनी फक्त राजकारण केले. मग तुम्ही काय केले? घरात बसून फक्त वायफळ बडबड करायची. काहीही बोलायचे आणि त्या सामनामध्ये काहीही लिहायचे, ते कोणी वाचत नाही आता. त्यामुळे तुम्ही जर थोडीफार मेहनत केली, आमचे अनुकरण केले तर 2-5 लोक जास्तीचे निवडून येतील. संजय राऊतांच्या अकलेचे दिवाळे निघाले संजय राऊत यांनी शामा प्रसाद मुखर्जी यांच्यावर टीका केली होती, त्यावर प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे. वाट्टेल तसे बोलायचे. त्यांना माहीत तरी आहेत का मुखर्जी यांच्याबद्दल? काही झाले तरी काहीही बोलायचे, फक्त टीकाच करायची याशिवाय त्यांना काही येत नाही आणि म्हणून त्यांची लायकी लोकांनी त्यांना दाखवली आहे. अजून थोडी उरली सुरली असेल तर उद्धवजींनी सांभाळून ठेवावी, यांना बाहेर काढा आधी, यांची बडबड थांबवा. अन्यथा जे कोणी आमदार आहेत ते सुद्धा राहणार नाहीत. नसरापूरच्या प्रकरणावर आज कॅबिनेटमध्ये चर्चा पालघरमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेवर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, अनेक ठिकाणी अशा घटना घडताना दिसत आहेत. अनेक प्रकरणे समोर येत आहेत. यात जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे, असा विश्वास देखील महाजन यांनी दिले आहे. तसेच नसरापूरच्या प्रकरणावर आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली असून यावर फास्ट ट्रॅक कोर्टात तातडीने निर्णय घेऊन कठोर शिक्षा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे महाजन यांनी म्हटले आहे. दरम्यान, सध्या तापमान वाढीमुळे मृत्यू होण्याचे प्रकरण वाढत आहे. यावर भाष्य करताना गिरीश महाजन म्हणाले, आपण बघत आहोत की तापमान वाढत चालले आहे, काही ठिकाणी आभाळ आहे, काही ठिकाणी तापमानाचा उच्चांक गाठला गेला आहे. तसेच दुपारच्या वेळेत 11 ते 5 या कालावधीत बाहेर पडणे टाळावे, अशा सूचना आम्ही दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *