साधना सप्ताहातील उल्लेखनीय कामगिरी:हिंगोलीच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा शुक्रवारी मुंबईत होणार गौरव

0
whatsapp-image-2026-05-05-at-33332-pm_1777975436.jpeg




केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत साधना सप्ताहामध्ये हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी विविध प्रशिक्षणे पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यासप्ताहातील उत्कृष्ठ कामगिरी बद्दल जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना पुरस्कार जाहिर झाला असून शुक्रवारी ता. ८ मुंबई येथे टेक वारी या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. केंद्र सरकारने मिशन कर्मयोगी उपक्रम देशभरात हाती घेतला आहे. या उपक्रमांमध्ये विविध प्रशिक्षण, अभ्यासक्रमासह इतर उपक्रम जिल्हा परिषद व इतर शासकिय कार्यालयांनी राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या अभियानांतर्गत केंद्राच्या सूचने नुसार ता. २ ते ता. ८ एप्रील या कालावधीत साधना सप्ताह राबविण्यात आला. या सप्ताहात जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून एआय च्या प्रशिक्षणासोबतच इतर चार तासाचे प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाने, केशव गड्डापोड, विजय बोराटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, समाज कल्याण अधिकारी गिता गुठ्ठे, शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विभागांमधून सुमारे ५०९८ कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ५०२२ कर्मचाऱ्यांनी कोर्सस पूर्ण केले. तर ४७२२ कर्मचाऱ्यांनी चारतासाचा कोर्स पूर्ण केला आहे. त्यामुळे राज्यात इतर जिल्हयांच्या तुलनेत हिंगोली जिल्हा परिषदेच्या ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी कोर्सस पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा येणार असून कामात गतीमानता व अचुक कामे होतील. त्यामुळे प्रशासन गतीमान होऊन नागरीकांची कामे जलदगतीने होण्यात मदत झाली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना शासनाच्या सामान्य प्रशासनाच्या वतीने पुरस्कार जाहिर झाला आहे. मुंबई येथे शुक्रवारी ता. ८ दुपारी तीन वाजता मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या त्रिमुर्ती प्रांगण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे पत्र अप्पर मुख्य सचिव व्ही.राधा यांनी पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed