तरुणाच्या डोक्यात अडकला कोयता:जखमी तरुण स्वतः मुंबईतील सायन रुग्णालयात चालत आला; पाहा घटनेचा भयंकर VIDEO
![]()
मुंबई शहरातील वाढत्या गुन्हेगारीची झलक दाखवणारी एक धक्कादायक घटना सायन परिसरात समोर आली आहे. त्यात एक तरुण डोक्यात धारदार कोयता अडकल्याच्या स्थितीत स्वतःच रुग्णालयात चालत आल्याचे दिसून येत आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला असून, यामुळे नागरिकांत भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाचा काही व्यक्तींशी वाद झाला होता. या वादातूनच त्याच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कोयता थेट त्याच्या डोक्यात अडकला. मात्र, गंभीर जखमी असूनही या तरुणाने हार न मानता स्वतःच सायन रुग्णालय गाठले. त्याला त्या स्थितीत पाहून रुग्णालयातील सर्वजण हादरले. व्हायरल व्हिडिओमध्ये हा तरुण रुग्णालयात शांतपणे उभा राहून उपचाराची वाट पाहताना दिसत आहे. यामुळे परिस्थितीची गंभीरता अधिकच अधोरेखित होते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि ‘स्वप्ननगरी’ म्हणून ओळखली जाते. येथे दररोज हजारो लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात. इथे कोणीही उपाशी राहत नाही अशी ओळख असलेल्या या शहरात दुसऱ्या बाजूला गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. सायनमधील ही घटना त्याचेच एक भीषण उदाहरण म्हणून पाहिली जात आहे. सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया या व्हिडिओवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अनेकांनी जखमी तरुणाला तातडीने उपचार मिळायला हवेत, अशी मागणी केली आहे. काहींनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेष म्हणजे, व्हिडिओमध्ये जखमी तरुण उपचारासाठी थांबलेला असताना त्याच्या आसपास वैद्यकीय कर्मचारी दिसत नसल्याची बाबही अनेकांच्या संतापाचा विषय ठरली आहे. अशा अवस्थेत असलेल्या व्यक्तीला त्वरित मदत मिळायला हवी होती, किमान बसण्यासाठी तरी योग्य व्यवस्था असायला हवी होती, अशा प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या आहेत. काहींनी तर राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत तीव्र चिंता व्यक्त करत प्रशासन आणि पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कधी आणि कुठे घडली याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे मुंबईतील नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले असून, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.
