बिलोलीत अवैध रेती उत्खननावरून वाद पेटला; तहसिलदारांवर आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू
नांदेड (प्रतिनिधी) – बिलोली तालुक्यातील शासकीय रेती घाटांमध्ये सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांमुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. रेती उत्खननात अनियमितता झाल्याचा आरोप करत संबंधित तहसिलदारांविरोधात कठोर चौकशीची मागणी करण्यात आली असून याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बिलोली शहरप्रमुख शिवकुमार पटणे यांनी यापूर्वी २७ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून तहसिलदार गजानन शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. संबंधित अधिकाऱ्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी करण्याबरोबरच त्यांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड आणि सोशल मीडियावरील संवादाचीही तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
तक्रारीनुसार, सगरोळी, बोळेगाव, मंजगाव आणि येसगी येथील चार शासकीय रेती घाटांवर मंजूर क्षमतेपेक्षा अनेक पटीने उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घाटांवर दिवस-रात्र मोठ्या यंत्रसामग्रीच्या साहाय्याने रेती काढली जात असून शेकडो ट्रकद्वारे ही रेती तेलंगणा व कर्नाटक राज्यात अवैधरित्या पाठवली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
याशिवाय, रेती वाहतुकीदरम्यान बनावट बिलांचा वापर होत असल्याचा गंभीर मुद्दाही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती भरून नेली जात असतानाही कागदोपत्री मात्र कमी प्रमाण दाखवले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. या संपूर्ण व्यवहाराला प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे संरक्षण मिळत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, २० एप्रिल आणि २७ एप्रिल रोजी लेखी तक्रार देऊनही आठवडाभर कोणतीही कारवाई न झाल्याने संशय अधिक बळावल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. रेती ठेकेदारांशी आर्थिक व्यवहार करून मोठ्या प्रमाणात लाच घेतली जात असल्याचा आरोपही करण्यात आला असून त्यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रशासनाने तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यापूर्वी देण्यात आला होता. त्यानुसार आज दि. ४ मे २०२६ रोजी दुपारनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवकुमार पटणे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. या आंदोलनामुळे बिलोली तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून प्रशासन आता कोणती भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
