Baramati By Election Result | बारामतीत सुनेत्रा पवारांचा विजय पक्का; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाल्या, ‘गुलाल उधळू नका’
Baramati By Election Result | दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची (Baramati By Election 2026) मतमोजणी सध्या सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी या निवडणुकीत निर्णायक आघाडी घेतली असून, त्यांचा विजय आता जवळपास निश्चित मानला जात आहे.
मतमोजणीचे ताजे कल
आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू असलेल्या मतमोजणीत, नवव्या फेरीच्या अखेरीस सुनेत्रा पवार यांनी तब्बल ७८,५२८ मतांची भक्कम आघाडी घेतली आहे. ही आघाडी प्रत्येक फेरीगणिक वाढत चालली आहे. या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात एकूण २२ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, सुनेत्रा पवार या निवडणुकीत दोन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
अजितदादांचा विक्रम मोडणार?
बारामतीत सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम अजित पवारांच्या नावावर आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा १,६५,२६५ मतांनी दारुण पराभव केला होता. हा विक्रम मोडीत काढण्यासाठी आता १,६५,२६६ या जादुई आकड्याची आवश्यकता असून, सुनेत्रा पवार हा पल्ला गाठतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सुनेत्रा पवारांची पहिली भावूक प्रतिक्रिया आणि कार्यकर्त्यांना आवाहन
X अकाऊंटवर पोस्ट शेअर सुनेत्रा पवा यांनी म्हटलं, “आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते.
आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया.
दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे.
निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची!”
आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते.
आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम…
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) May 4, 2026
दरम्यान, या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्याविरोधात एकूण 22 उमेदवार रिंगणात होते. मात्र एक्झिट पोल्सनुसार त्यांचा विजय दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
News Title: Baramati By Election Result Sunetra Pawar share emotional post
