सात्रळमध्ये विजेच्या तारांचा झाडात प्रवाह:शेतकरी थोडक्यात बचावला
![]()
प्रतिनिधी | सात्रळ महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभालीच्या दाव्यांमधील फोलपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सात्रळ-रामपूर शिवरस्त्यावरील गट क्रमांक ३०४ मध्ये वीजवाहिन्यांच्या तारा प्रचंड लोंबकळत असल्याने आंब्याच्या झाडात विद्युत प्रवाह उतरला. यात शेतकरी रणजित डुकरे यांना विजेचा धक्का बसला, सुदैवाने त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून ते या जीवघेण्या संकटातून थोडक्यात बचावले. साई सात्रळ डेअरीचे चंद्रकांत डुकरे यांची या शिवारात शेती आहे. त्यांचे बंधू रणजित डुकरे हे शुक्रवारी शेतात फवारणीचे काम करत होते. काम आटोपल्यानंतर विश्रांतीसाठी ते लगतच्या आंब्याच्या झाडाखाली बसले असता, त्यांचा हात चुकून झाडाला लागला. झाडात वीज प्रवाह उतरलेला असल्याने त्यांना झटका बसून ते लांब फेकले गेले. उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परिसरात अनेक ठिकाणी वीजवाहक तारा केवळ १० ते १२ फूट उंचीवर लोंबकळत आहेत. वाकलेले खांब आणि लोंबकळणाऱ्या तारांमुळे झाडांमध्ये वीज उतरण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते किरण कडू यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर केला. पावसाळा तोंडावर असूनही सात्रळ परिसरात अद्याप कोणतीही देखभाल झालेली नाही. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मुजोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करून तातडीने वीजवाहिन्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी हंभीरराव कडू, बाळासाहेब डुकरे, प्रवीण डुकरे यांनी केली आहे. अभियंता म्हणतात, हा भाग आमच्या हद्दीत येत नाही या गंभीर घटनेनंतर डुकरे यांनी सात्रळ उपकेंद्राच्या प्रमुख अभियंत्यांशी संपर्क साधला. मात्र, संबंधित अधिकाऱ्याने कोणतीही सहानुभूती दाखवण्याऐवजी उद्धटपणे उत्तरे दिली. हा भाग आमच्या हद्दीत येत नाही, असे सांगत आपली जबाबदारी झटकल्याचा आरोप पीडित शेतकरी कुटुंबाने केला आहे.
