मोबाइल चॅटिंगवरून वाद:पत्नीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न, मुलालाही मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा
![]()
पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथे मोबाइल चॅटिंगवरून झालेल्या वादातून एका पतीने पत्नीचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मारहाणीत पत्नीसह मुलगाही जखमी झाला आहे. विजय फुलचंद कारंडे (वय ४०, रा. क्वीन्स गार्डन, पुणे स्टेशनजवळ) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. त्याने आपली पत्नी रुपाली (वय ३०) आणि मुलाला बॅटने मारहाण केल्याचा आरोप आहे. ही घटना ३० एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास आरोपीच्या घरात घडली. विजय कारंडे मोबाइलवर चॅटिंग करत असताना पत्नी रुपालीने त्याला जाब विचारला. यावरून चिडून त्याने पत्नीला शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यानंतर कारंडेने पत्नी आणि मुलाला बॅटने मारहाण केली. तसेच, त्याने पत्नीचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रुपालीने याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सदनिकेचे कुलूप तोडून चार लाखांचे दागिने चोरी सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना ओैंध परिसरात घडली. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि कुटुंबीय ओैंधमधील सानेवाडी भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. चार दिवसांपूर्वी महिला आणि कुटुंबीय हे बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. बेडरूम मधील कपाट उचकटून चोरट्यांनी चार लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. तक्रारदार महिला रविवारी (३ मे) बाहेरगावाहून परतल्या. तेव्हा सदनिकेत चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे पुढील तपास करत आहेत.
