चोरट्यांनी पोलिस बनून पाच लाखांचे दागिने लुटले:पुण्यात दोन घटना, ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत गुन्हे दाखल
![]()
पुण्यात पोलिस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून सुमारे पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले. कोथरूड आणि पाषाण परिसरात रविवारी हे प्रकार घडले असून, याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला प्रकार कोथरूडमधील पौड रस्त्यावर घडला. जनवाडी परिसरात राहणारे एक ज्येष्ठ नागरिक रविवारी सकाळी नऊ वाजता पत्नीसह दुचाकीवरून भूगावला जात होते. पौड रस्त्यावरील जैन लोहिया आयटी पार्कसमोरील पीएमपी थांब्याजवळ चार चोरट्यांनी त्यांना अडवले. आम्ही पोलिस आहोत, या भागात ज्येष्ठांना लुटले जात आहे, त्यामुळे दागिने काढून ठेवा, असे सांगून त्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडील चार लाख आठ हजार रुपयांची सोन्याची साखळी कागदात गुंडाळण्याचा बहाणा केला आणि त्यांचे लक्ष नसताना ती चोरून पळ काढला. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक मोहन चव्हाण तपास करत आहेत. दुसरी घटना पाषाण-सूस टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. बाणेर येथील ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक रविवारी सकाळी साडेआठ वाजता पाषाण-सूस टेकडीकडे जात असताना दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. त्यांनीही पोलिस असल्याची बतावणी करत, या परिसरात ज्येष्ठांना लुटले जात असल्याचे सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडील एक लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी आणि सोन्याची साखळी काढून घेतली व पसार झाले. या घटनेप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक मांढरे पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांतील चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. ज्येष्ठ नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
