शिंगणापुरात २ चिमुकले ३० मिनिटांत सापडले:दोन कुटुंबे झाली होती हवालदिल; पोलिसांच्या तत्परतेमुळे मुले सुखरूप
![]()
प्रतिनिधी | सोनई शनिवारच्या सुटीनिमित्त शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी झालेल्या प्रचंड गर्दीत दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील चिमुकले आपल्या पालकांपासून दुरावले. पालकांच्या काळजाचा ठोका चुकला असतानाच, शनिशिंगणापूर पोलिसांनी अवघ्या ३० मिनिटांच्या आत शोधमोहीम फत्ते करत दोन्ही मुलांना सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे. मुंबईतील त्रिशा राजेश सोनी आणि धुळे (साक्री) येथील ३ वर्षांचा हिमांशु महेंद्र बागुल हे दोन चिमुकले मंदिर परिसरातील गर्दीत हरवले होते. मुलांच्या पालकांनी घाबरलेल्या अवस्थेत पोलिसांकडे धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी तातडीने पथके तयार केली आणि संपूर्ण मंदिर परिसर पिंजून काढला. सपोनि आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भटूआण्णा कारखेले, दत्तात्रय पवार, भास्कर दरंदले, सुरेश देशमाने, रमेश लबडे, मृत्युंजय मोरे आणि तृप्ती शेळके यांनी शोधकार्य राबवले. अवघ्या काही वेळात त्रिशा ही मंदिर काउंटरजवळ, तर हिमांशु महामार्गालगत सुखरूप सापडले. मुलांना पाहताच पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि पोलिसांच्या डोळ्यांतही कर्तव्याचे समाधान दिसले. पालकांनो, मुलांची काळजी घ्या : गर्दीच्या ठिकाणी मुलांच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी काही महत्त्वाचे आवाहन केले आहे: मुलांच्या खिशात किंवा जवळ पालकांचा मोबाईल क्रमांक असलेला कागद ठेवावा. मुलांना गर्दीत एकटे सोडू नये, मुल हरवल्यास तात्काळ जवळच्या पोलीस चौकशी किंवा सुरक्षा रक्षकांशी संपर्क साधावा.
