अनुराधा पतसंस्थेच्या अध्यक्षाचा परभणी येथे तुरुंगात ऱ्हदयविकाराने मृत्यू:20 महिन्यापासून होता तुरुंगात, 6.27 कोटींचे अपहार प्रकरण

0
730-x-548-new-2026-05-04t113709890_1777874927.jpg




हिंगोली येथील अनुराधा पतसंस्थेच्या ६.२७ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात मागील २० महिन्यापासून परभणीच्या तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या पतसंस्थेच्या अध्यक्षाचा ऱ्हदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. ३ दुपारी घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील अनुराधा पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कांबळे (रा. गोपाल टॉकीज जवळ वाशीम) याने पतसंस्था स्थापन करून ठेवीदारांना जादा व्याजदराने परताव्याचे अमिष दाखविले होते. यामध्ये इतर संस्थेपेक्षा अधिक म्हणजेच १० ते १२ टक्के व्याज देण्याचे अमिष दाखवून ४०३८ ठेवीदारांकडून ६.२७ कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या होत्या. मात्र ठेवीदारांनी ठेवी दिल्यानंतर त्याची मुदत संपल्यानंतरही ठेवीची रक्कम परत केली नाही. त्यानंतर पतसंस्थेच्या लेखा परिक्षणामध्ये अध्यक्ष अशोक कांबळे व संचालकांनी बनावट ठराव व बनावट कर्जप्रकरण मंजूर करून सदर रकमेचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले होते. ता. २४ डिसेंबर २०१९ ते ता. २४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत अपहार केल्याचे दिसून आले. या प्रकारमुळे ठेवीदारांमधून एकच खळबळ उडली होती. ठेवीची रक्कम परत मिळणार की नाही असा मोठा प्रश्‍न ठेवीदारांसमोर उभा राहिला होता. त्यानंतर या प्रकरणात लेखा परिक्षक अनिल बंधू यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कांबळेसह १२ जणांवर ६.२७ कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणात हिंगोली शहर पोलिस ठाण्यात ता. ४ मे २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. या प्रकरणात अध्यक्ष अशोक कांबळे यास पोलिसांनी अटक केली होती. ता. ९ ऑगस्ट २०२४ पासून तो न्यायालयीन कोठडीत परभणीच्या तुरुंगात होता. दरम्यान, आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याला अस्वस्थ वाटत असल्याने तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने परभणीच्या शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. आता पैसे परत मिळण्याचा प्रश्‍न कायम हिंगोली पोलिसांनी काही दिवसांपुर्वीच अनुराधा पतसंस्थेकडून फसवणुक झालेल्या ठेवीदारांकडून ठेवीच्या पावत्या व अर्ज मागविले होते. त्यामुळे ठेवी परत मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र आता अध्यक्ष अशोक कांबळे याच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा ठेेवी परत मिळण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *