शिक्षणाला महत्व जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने यश मिळेल:स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा केला सन्मान
![]()
प्रतिनिधी|अहिल्यानगर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर यश संपादन करता येते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमास महापौर ज्योती गाडे, शहर पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे, स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, नगरसेवक महेश लोंढे, राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या संचालिका नंदा पांडुळे आदी उपस्थित होते. आ. जगताप म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या माध्यमातून यशाची दारे खुली झाली आहेत. संचालिका नंदाताई पांडुळे यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देत गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे मोलाचे कार्य केले आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्या आवडीच्या क्षेत्रातही प्रगती साधावी. क्रीडा, प्रशासकीय सेवा, उद्योग अशा अनेक क्षेत्रांत संधी उपलब्ध असून योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थी मोठे यश मिळवू शकतात. महापौर ज्योती गाडे म्हणाल्या, विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे उज्ज्वल भविष्य आहेत. त्यांना योग्य दिशा, मार्गदर्शन आणि संधी मिळाली तर ते देशाचे नाव उज्ज्वल करतील. स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत राजमुद्रा करिअर अकॅडमी हे केवळ प्रशिक्षण केंद्र नसून विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल ठरले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांनी क्रीडा क्षेत्रातही करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळांनाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. प्रारंभी ज्ञानदेव पांडुळे यांनी प्रास्ताविक केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून ग्रामीण भागातील तरुणाईला नवे ध्येय आणि प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
