धामणगाव (वैद्य) येथे भीषण आग, 25 घरे भस्मसात:शेतमालकावर गुन्हा दाखल, पालकमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

0
74aed4b7-4e25-43ce-acb5-ccb8a32c7e87_1777817339777.jpg




नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव (वैद्य) येथे शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या भीषण आगीत सुमारे २५ घरे भस्मसात झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, गावाशेजारील शेतात जाळण्यात आलेल्या धुरामुळे आणि अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत गावात पोहोचली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि अनेक घरांना कवेत घेतले. या प्रकरणी शेतमालक कैलास ढाकुलकर यांच्या विरोधात आग लावून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच भिवापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर शहर आणि ग्रामीण भागातून ७ अग्निशमन दलाची वाहने बोलावण्यात आली. परिसरातील गॅस सिलेंडर तात्काळ हटवण्यात आल्याने संभाव्य स्फोटाचा मोठा धोका टळला. पोलिसांनी आगीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढत मोठा अनर्थ टाळला. बचावकार्यात धाडस दाखवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. रविवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांना दिलासा दिला. त्यांनी मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीतून (CM Relief Fund) मदत, कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थानकडून २० लाख रुपये, तसेच प्रत्येक बाधित कुटुंबाला २३,००० रुपयांची तातडीची मदत त्यांनी जाहीर केली. याशिवाय, बाधित कुटुंबांना एक महिन्याचे अन्नधान्य, घरबांधणीसाठी मोफत रेती, कागदपत्रांसाठी विशेष शिबिर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सायकली, नवीन वीजमीटर, गॅस सिलेंडर, भांडी संच, जनावरांसाठी अनुदान, आरोग्य शिबिर आणि पाणीपुरवठा अशा विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. उमरेड एमआयडीसीतील सुमारे ४०-५० कंपन्यांना सीएसआर फंडातून मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे. बाधित कुटुंबीयांसाठी स्थानिक शाळेत तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, काही कुटुंबांना त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यासाठी चार बसची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, अशा घटना टाळण्यासाठी शेतात वणवा पेटवण्यावर कायदेशीर बंदी आणण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्यात वणव्यांमुळे आगी लागल्याच्या अनेक घटना घडतात, हे लक्षात घेता यावर बंदी आणण्यासाठी कायदा असावा असे ते म्हणाले. केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापनात आगीमुळे नुकसानभरपाईची तरतूद आहे, परंतु राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनात अशी तरतूद नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed