मौजमजेसाठी मोबाइल चोरणारे दोघे जेरबंद:पुण्यातून 2.65 लाखांचे 43 मोबाइल जप्त
![]()
पुणे, प्रतिनिधी: मौजमजा करण्यासाठी नागरिकांचे मोबाइल चोरणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे एकूण ४३ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी राजकुमार सोनू पाटील (वय १९, रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) आणि गौरव बाळू खुडे (वय १९, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. येरवडा परिसरात २९ एप्रिल रोजी रात्री एका पादचाऱ्याचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना घडली होती, ज्याबाबत येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना, पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावणारे चोरटे ते विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी साईनाथ म्हस्के यांना मिळाली. या माहितीच्या आधारे तपास पथकाने सापळा रचून पाटील आणि खुडे यांना पकडले. चौकशीदरम्यान, दोघांनी पुणे रेल्वे स्थानक आणि निर्जन रस्त्यांवरून पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावून नेल्याचे कबूल केले. त्यांनी मौजमजेसाठी हे गुन्हे केल्याचेही सांगितले. त्यांच्याकडून एकूण २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ४३ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींनी आणखी कुठे कुठे चोऱ्या केल्या आहेत तसेच त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत याबाबत देखील सखोल चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत आणि सहायक आयुक्त सुनील जैजापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय ठाकर, सहायक निरीक्षक प्रसन्न जराड, उपनिरीक्षक किशोर बेरड, शैलेश बावळे, मुकुंद कोकणे, संदीप जायभाय, साईनाथ म्हस्के, नटराज सुतार आणि बालाजी सोगे यांच्या पथकाने केली.
