हास्य चळवळ लोकचळवळ व्हावी- राजेश पांडे:जागतिक हास्य दिनानिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवाराचा विशेष कार्यक्रम
![]()
हास्य ही एक सकारात्मक मानवी कृती असून त्याचे शारीरिक आणि मानसिक स्तरावर अनेक फायदे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहेत. आता हास्य चळवळ ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे मत पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी व्यक्त केले. जागतिक हास्य दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल काटे आणि सुमन काटे यांनी स्थापन केलेल्या या परिवाराचे २५० हास्यक्लब असून २५ हजार सदस्य आहेत. यावेळी व्यासपीठावर नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे आणि सुमन काटे, मुख्य समन्वयक विश्वस्त मकरंद टिल्लू, विश्वस्त जयंत दशपुत्रे, सचिव पोपटलाल शिंगवी, ज्येष्ठ उद्योजक प्रकाश धोका, पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, मधुमेह नियंत्रण विशेषज्ञ डॉ. भाग्येश कुलकर्णी, ऑस्टीओपॅथ डॉ. विनायक देंडगे यांच्यासह विजय भोसले, प्रमोद ढेपे, हरीश पाठक, दत्तात्रय कुंदेन आणि अतुल सलागरे उपस्थित होते. कार्यक्रमात अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ उद्योजक प्रकाश धोका यांचा राजेश पांडे यांच्या हस्ते पुणेरी पगडी आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, हास्ययोग चळवळीचा प्रचार-प्रसार अधिक वेगाने होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या स्टिकरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना राजेश पांडे म्हणाले की, हास्य चळवळ स्वतःसह इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करते. सभोवतालचे ताणतणाव पाहता या चळवळीची वाढ होणे अत्यंत आवश्यक आहे. पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले की, पुणे शहरातील सुमारे २५० हून अधिक उद्यानांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या या हास्य चळवळीसाठी राखीव वेळ उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, पुणे मनपा स्थायी समितीद्वारे हास्ययोग चळवळीच्या उपक्रमांना कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही भिमाले यांनी दिले. ज्येष्ठ उद्योजक प्रकाश धोका यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले की, गेल्या ३० वर्षांपासून मी नवचैतन्य हास्ययोग परिवाराशी संबंधित आहे. या वयातही मला औषधाची एकही गोळी घ्यावी लागत नाही, हे केवळ हास्ययोगामुळे शक्य झाले आहे. या चळवळीचा प्रचार-प्रसार आता भारताबाहेरही होणे आवश्यक आहे. यावेळी नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे यांनी मनोगत व्यक्त केले. विश्वस्त मकरंद टिल्लू यांनी हास्य प्रात्यक्षिके सादर केली आणि ‘स्वच्छ पुणे सुंदर पुणे हसरे पुणे’ करण्यासाठी एक लाख लोकांपर्यंत हास्य योग पोहोचवणार असल्याचे जाहीर केले.
