भारतीय संस्कृतीची मूल्ये जपणे काळाची गरज:उद्योजक अभय फिरोदिया यांचे प्रतिपादन, ज्ञान-परंपरेचा मिलाफ महत्त्वाचा
![]()
भारतीय संस्कृतीमधील मूल्ये म्हणजे जीवनाचे तत्वज्ञान असून ती जपणे सध्याच्या काळाची गरज आहे, असे मत फोर्स मोटर लि. चे चेअरमन आणि जागतिक किर्तीचे उद्योगपती अभय फिरोदिया यांनी व्यक्त केले. पुण्यभूषण फौंडेशनतर्फे आयोजित एका विशेष वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यंदाच्या पुण्यभूषण पुरस्काराचे मानकरी असलेल्या ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांच्यासोबत पत्रकारांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुण्यभूषण फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई उपस्थित होते. फिरोदिया यांनी विविध विषयांवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली. भारताला भाषांचे मोठे वैभव लाभले असून, वेगवेगळ्या प्रांतांमधील भारतीय भाषा म्हणजे संस्कृतीचा मोठा खजिना आहेत, असे फिरोदिया म्हणाले. त्यांनी आपल्या बालपणाचा उल्लेख करत सांगितले की, त्यांचे शिक्षण गुजराती, हिंदी, इंग्रजी आणि मराठी माध्यमांमध्ये झाल्यामुळे ते या चारही भाषा अस्खलीतपणे बोलू शकतात. भारताला विद्येची, ज्ञानाची तसेच उद्योग आणि उद्यमशीलतेची समृद्ध परंपरा आहे. वाणिज्य आणि ज्ञान परंपरा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्राचीन भारताला ‘सोने की चिडीया’ म्हटले जायचे, कारण त्याची व्यापारी संस्कृती अत्यंत समृद्ध होती. मात्र, विविध आक्रमणांमुळे भारताचे मोठे नुकसान झाले. आता भारताने उद्योग-व्यापारात जागतिक पातळीवर स्थान निर्माण करताना आपल्या संस्कृतीच्या मूल्यांची जोपासना करणे आवश्यक आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. गृहास्थश्रमात असताना आपण जी संपत्ती निर्माण करतो, ती समाज आणि देशासाठी निर्माण करत आहोत, या भावनेने व्यवसाय केला पाहिजे. भारतीय संस्कृतीने सांगितलेल्या चारही आश्रमांचा अवलंब केल्यास जीवन सुखी आणि समाधानी होऊ शकते. जैन, बौद्ध, शीख आणि वैदिक या सर्व परंपरांचे तत्वज्ञान एकच आहे, असेही त्यांनी नमूद केले. या तत्वज्ञानाचे मूर्तीमंत उदाहरण ‘अभय प्रभावन’ या कायमस्वरूपी प्रदर्शनाच्या माध्यमातून उभारण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे फिरोदिया यांनी सांगितले. थोर भारतीय संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढ्यांकडे हस्तांतरित व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
