नसरापूर पीडितेच्या वडिलांचा राजकीय नेत्यांना इशारा:जोपर्यंत आरोपीला फाशी नाही, तोपर्यंत भेटू नका

0
6b946654-c165-4337-afb3-1adf8e7c3a3c_1777806190698.jpg




पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील घटनेतील पीडित चिमुरडीच्या वडिलांनी राजकीय नेत्यांच्या भेटीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने भेटू नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. मुलीच्या अस्थी विसर्जनासाठी देहू येथे गेले असताना, त्यांनी समाजमाध्यमाद्वारे एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. पीडितेच्या वडिलांनी म्हटले आहे की, “जोपर्यंत माझ्या मुलीला पूर्ण न्याय मिळत नाही आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत एकाही राजकीय व्यक्तीने आमच्या सांत्वनासाठी किंवा भेटीसाठी आमच्या घराची पायरी चढू नये.” अनेक राजकीय नेते आणि पदाधिकारी सांत्वन करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही भूमिका मांडली. “आम्हाला कोणाचेही सांत्वन नको आहे, फक्त माझ्या मुलीला न्याय हवा आहे,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले. आरोपीला फाशीची शिक्षा जाहीर होईपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तीला भेटणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. त्यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आणि समाजात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानेही नसरापूर प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी जाहीर निवेदनात म्हटले आहे की, पीडितेला जलदगतीने न्याय मिळावा यासाठी हे प्रकरण ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवण्याची शिफारस राज्य सरकारकडे करण्यात येणार आहे. तसेच, आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याबाबतही शिफारस केली जाईल. आयोगाकडून सध्या प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेतली जात असून योग्य त्या सूचना दिल्या जात आहेत. नागरिकांचा संताप रास्त असला तरी, सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन आयोगाने केले आहे. पीडित कुटुंबाला शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळावे यासाठी आयोग विशेष प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed