नसरापूर प्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे पीडित कुटुंबाच्या भेटीला:वेगवान न्यायासाठी प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणार

0
221b4f88-6662-4d2b-96da-b7b5b1bfc445_1777808517398.jpg




पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना नेत्या आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. या भेटीदरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. कुटुंब मानसिक धक्क्यात असल्याने त्यांनी कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ न घेता शांततेत संवाद साधल्याचे नमूद केले. कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी आरोपीला तातडीने कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. यासाठी वरिष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली. बालहक्क आयोगाने या प्रकरणात अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. त्यांनी योग्य सही आणि पोलीस स्टेशनच्या गुन्हा क्रमांकासह प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विशेष तपास समिती स्थापन केल्याचे पत्र प्राप्त झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कुटुंबाशी संवाद साधून त्यांना धीर दिला आहे. सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी पूर्णपणे उभे असल्याचा संदेश त्यांनी दिला. डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, न्याय मिळवून देणे, तसेच कुटुंबाचे संरक्षण आणि पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी आहे. सोशल मीडियावर पीडित मुलीचे फोटो किंवा ओळख उघड करणारे संदेश प्रसारित करणे गंभीर आणि बेकायदेशीर असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. पॉक्सो कायद्यानुसार पीडितेची ओळख उघड करणे गुन्हा आहे. नागरिकांनी असे संदेश तात्काळ डिलीट करावेत, असे आवाहन त्यांनी केले. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. या घटनेचा जात-धर्माच्या आधारावर गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. न्याय हा धर्म किंवा जात पाहून होत नाही, असे त्या म्हणाल्या. सर्व समाज एकत्र येऊन पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे, हेच खरे चित्र असल्याचे त्यांनी नमूद केले. काही घटक पीडित कुटुंबाला आंदोलनात सहभागी होण्यास प्रवृत्त करत असल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त केली. दुःखात असलेल्या कुटुंबाला आंदोलनासाठी भाग पाडणे अमानुष आहे. आंदोलन करायचे असल्यास इतरांनी करावे, पण कुटुंबाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed