'शक्ती' कायद्यातील तरतुदी नव्या कायद्यात समाविष्ट:गुन्हेगारांवर कडक कारवाई करा – डॉ. नीलम गोऱ्हे
![]()
पुणे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि महिला सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘शक्ती’ कायदा, नवीन फौजदारी कायदे आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर आपले मत व्यक्त केले. डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, ‘शक्ती’ कायद्यातील अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी आता लागू झालेल्या ‘भारतीय न्याय संहिता’ या नवीन कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सात वर्षांपर्यंत शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना नोटीस देण्याची सध्याची तरतूद रद्द करून त्यांना थेट अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, राज्यात उद्योगांसाठी येणाऱ्या परप्रांतीय कामगारांची नोंद ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. म्हाळुंगे येथे तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणाबाबत डॉ. गोऱ्हे यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणात आरोपींविरोधात लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले. चाकण परिसरात मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढल्या असून, पोलिसांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे. पीडित महिला आणि बालकांच्या समुपदेशनासाठी महिला व बाल कल्याण विभागाने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सुचवले. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आपण सातत्याने विधिमंडळात मांडत असल्याचे सांगून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांवर सतत लक्ष ठेवणे महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. पोलिसांची संख्या वाढवणे आणि त्यांना आवश्यक साधनसामुग्री पुरवणे ही काळाची गरज आहे. सध्या समाज माध्यमांवर वाढणाऱ्या अश्लीलतेबद्दल आणि शोषणाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. समाज माध्यमांचा वापर जबाबदारीने व्हावा आणि गुन्हेगारांच्या दोषसिद्धीचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी लोकप्रतिनिधींनी देखील पुढाकार घेऊन नवीन कायद्यांबाबत समाजात जागृती करणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
