लता-आशा यांना वाद्य वादनातून 'स्वरांजली':गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन
![]()
गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे भारतरत्न स्व. लता मंगेशकर आणि पद्मविभूषण स्व. आशा भोसले यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘स्वरांजली’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात १५ हून अधिक वाद्यांद्वारे २५ कलाकार विविध गीते सादर करतील. या तीन दिवसीय सोहळ्यात मराठी-हिंदी चित्रपट गीतांबरोबरच अभंग, ठुमरी, नाट्यसंगीत आणि गझल ऐकायला मिळतील. सुगम संगीत क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीबद्दल रमाकांत परांजपे, शामकांत परांजपे आणि विवेक परांजपे यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. ६ ते शुक्रवार, दि. ८ मे २०२६ या कालावधीत गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन दि. ६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता इन्कम टॅक्सच्या अतिरिक्त आयुक्त मुग्धा सरदेशपांडे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य प्रमोद मराठे यांनी दिली. गांधर्व महाविद्यालयातर्फे केवळ वाद्य वादनातून स्वरांजली अर्पण करण्यात येणारा हा पहिलाच कार्यक्रम असून तो सर्वांसाठी खुला आहे. गांधर्व महाविद्यालयाचा ९४वा वर्धापन दिन, आद्य गांधर्व महाविद्यालयाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव तसेच पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या आज्ञेनुसार १९३२ मध्ये गांधर्व महाविद्यालय, पुणेची स्थापना आणि महाविद्यालयाच्या स्वत:च्या वास्तूत सुरू होऊन झालेली २० वर्षे याचे निमित्त साधून हा वर्धापनदिन संगीत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ‘स्वरांजली’ कार्यक्रमाची सुरुवात दि. ६ मे रोजी डॉ. प्रमोद गायकवाड यांच्या सनई वादनाने होईल. त्यानंतर संजय भावे (सॅक्सोफोन), संजय गोगटे (ऑर्गन), सौरभ वर्तक (बासरी), सचिन जांभेकर (संवादिनी), अनिल गोडे (एकॉर्डियन), शंतनू गोखले (संतूर), अंजली सिंगडे-राव (व्हायोलिन), साक्षी शेवलीकर (मोहनवीणा) आणि अनिल पेंडसे (मेंडोलिन) यांचे सादरीकरण होणार आहे. याच दिवशी सचिन जांभेकर यांना पंडित तुळशीदास बोरकर स्मृती संगतकार पुरस्कार मुग्धा सरदेशपांडे यांच्या हस्ते प्रदान केला जाईल. दि. ७ मे रोजी मिलिंद तुळणकर (जलतरंग), स्वप्ना दातार (व्हायोलिन), शामकांत सुतार (माउथ ऑर्गन), प्रभंजन पाठक (व्हायोलिन), विजय तुळसकर (सिंथेसायझर/संवादिनी), अमर ओक (बासरी), कल्याणी देशपांडे (सतार), दिप्ती कुलकर्णी (पियानिका) आणि पंडित प्रमोद मराठे (संवादिनी) यांचे सादरीकरण होईल. दि. ८ मे रोजी रमाकांत परांजपे (व्हायोलिन), शामकांत परांजपे (विविध वाद्ये) आणि विवेक परांजपे (सिंथेसायझर) यांचा सादरीकरण आणि संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्याशी संगीतकार पराग माटेगावकर संवाद साधणार आहेत. गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे यावेळी रमाकांत परांजपे, शामकांत परांजपे आणि विवेक परांजपे यांना पंडित विनायकराव पटवर्धन स्मृती संगीत जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण रामकृष्ण मठाचे मठाधीपती स्वामी श्रीकांतानंद यांच्या हस्ते होणार आहे.
