बिल मंजुरीसाठी कमिशनखोरीचा भंडाफोड:6 टक्क्यांच्या ‘कट’चा खेळ उघड! बदलापूर नगर परिषदेत ACB ची कारवाई

0
730-x-548-new-2026-05-02t110344909_1777700091.jpg




बदलापूरमध्ये नगर परिषदेतील भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेतील लेखाधिकारी विकास वैजीनाथ चव्हाण यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. कामाच्या बिलांसाठी आणि सुरक्षा ठेवीच्या रकमेवर 6 टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे स्थानिक प्रशासनात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाची सुरुवात एका कंत्राटदाराच्या तक्रारीतून झाली. तक्रारदाराची ‘नवनिर्माण इंटरप्रायजेस’ नावाची कंपनी असून त्यांना नगर परिषदेच्या 77 रस्त्यांच्या कामांचे कंत्राट मिळाले होते. यातील काही कामे पूर्ण झाल्यानंतर 17 लाख 44 हजार रुपयांचे बिल आणि पूर्वीच्या कामांची 4 लाख 99 हजार रुपयांची सुरक्षा ठेव अशी एकूण 22 लाख 43 हजार रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाली होती. मात्र ही रक्कम मंजूर करून देण्यासाठी लेखाधिकारी चव्हाण यांनी मोबदल्याच्या स्वरूपात लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, एकूण रकमेच्या 6 टक्के म्हणजेच सुमारे 1 लाख 34 हजार 500 रुपये लाच म्हणून देण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. 9 डिसेंबर 2025 रोजी ही तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानंतर एसीबीने याची प्राथमिक पडताळणी सुरू केली. 10 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत चव्हाण यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला. पुरावे गोळा केल्यानंतर अखेर 30 एप्रिल 2026 रोजी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत कलम 7 प्रमाणे विकास चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास चव्हाण हे वर्ग-1 दर्जाचे अधिकारी असून ते ठाण्यातील समता नगर परिसरात राहतात. या प्रकरणामुळे नगर परिषदेत बिल मंजुरीसाठी ‘टक्केवारी’ ठरलेली असते का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच या व्यवहारात इतर कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग होता का, याचाही तपास एसीबी करत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे आणखी मोठ्या स्तरापर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बदलापूर नगर परिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह या घटनेनंतर बदलापूर नगर परिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनात भीतीचे वातावरण आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे भविष्यात अशा प्रकारच्या भ्रष्टाचारावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, या तपासातून आणखी कोणती नावे समोर येतात आणि पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed