भोर येथील निर्घृण कृत्याने महाराष्ट्र हादरला:सुप्रिया सुळे यांची कडक भूमिका, सुषमा अंधारेही संतापल्या; दोषींना कठोर शिक्षेची मागणी

0
730-x-548-new-2026-05-02t114355428_1777702514.jpg




पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडलेल्या एका अत्यंत संतापजनक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. नसरापूर परिसरात चार वर्षांच्या चिमुरडीवर एका वृद्ध व्यक्तीकडून अमानुष अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला आहे. माहितीनुसार, ही लहान मुलगी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तिच्या आजीकडे नसरापूर येथे आली होती. दरम्यान, एका 65 वर्षीय आरोपीने तिला जवळच्या गोठ्यात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. मुलगी अचानक दिसेनाशी झाल्यानंतर कुटुंबीयांनी शोध सुरू केला असता ती जनावरांच्या गोठ्यात मृत अवस्थेत आढळून आली. या घटनेने गावात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले. घटनेनंतर गावकऱ्यांनी तत्काळ संशयिताला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पुणे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नसरापूरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी आरोपीविरोधात कडक कारवाईची मागणी करत संताप व्यक्त केला. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी – सुप्रिया सुळे या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही घटना मन सुन्न करणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी, असल्याचे म्हटले. तसेच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करत या प्रकरणाचा जलद तपास करून खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली. गृहमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर सुषमा अंधारेंची टीका दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही या घटनेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यांनी या कृत्याचा निषेध करत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. चार वर्षांच्या बालिकेवर असा अमानवी प्रकार घडतो, यापेक्षा दुर्दैवी काही असू शकत नाही, असे म्हणत त्यांनी गृहमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. राज्यातील नागरिक असुरक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. बालिकेच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून दोषींना शिक्षा दिली जाईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed