लालपरीचा प्रवास महागणार:स्वच्छतेसाठी प्रवाशांवर 2 रुपयांचा अधिभार आणि मोफत शौचालये; एसटीत मोठे बदल जाहीर

0
730-x-548-new-2026-05-02t104427911_1777698933.jpg




महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा प्रवास आता काहीसा महाग होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी सुविधा सुधारण्याचा मोठा निर्णय घेतला असला, तरी त्यासाठी तिकीट दरात वाढ होणार असल्याने प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. स्वच्छता आणि सुविधा सुधारणा या उद्देशाने तिकीटावर स्वच्छता अधिभार लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या कायापालटाचा आराखडा जाहीर केला आहे. यानुसार, अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली बसस्थानकांवरील अस्वच्छतेची समस्या दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत. मात्र, या सुधारणा अमलात आणताना प्रवाशांकडूनच निधी उभारण्याचा मार्ग निवडण्यात आला आहे. त्यामुळे तिकीट दरात प्रति प्रवास 2 रुपयांचा अतिरिक्त स्वच्छता अधिभार आकारला जाणार आहे. गेल्या काही वर्षांत एसटी स्थानकांवरील घाण आणि अपुऱ्या सुविधांबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. प्रवाशांनी पैसे घ्या पण दर्जेदार सुविधा द्या, अशी मागणी केल्यामुळे महामंडळाने नवीन मॉडेल लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, गोळा होणारा निधी थेट स्वच्छतेसाठी वापरला जाईल आणि त्यासाठी व्यावसायिक कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या योजनेअंतर्गत काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. सर्वात मोठा निर्णय म्हणजे 1 जूनपासून एसटी स्थानकांवरील सर्व शौचालये प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध केली जाणार आहेत. याशिवाय, प्रत्येक बसस्थानकाची दर चार तासांनी स्वच्छता करणे बंधनकारक करण्यात आले आहे. बस सेवा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक बस आतून आणि बाहेरून स्वच्छ असल्याची खात्री कंत्राटदारांना करावी लागणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी काही उपक्रम राबवले जाणार आहेत. प्रत्येक प्रमुख स्थानकावर वाचनालय उभारण्याची योजना आखण्यात आली आहे, जेणेकरून प्रवाशांचा वेळ उपयोगी जाईल. तसेच, चालक आणि वाहकांसाठी विश्रांतीगृहे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनाही अधिक चांगल्या परिस्थितीत काम करता येईल. प्रवास अधिक स्वच्छ आणि सोयीस्कर या सर्व बदलांची अंमलबजावणी 1 जूनपासून सुरू होणार आहे. योगायोगाने याच दिवशी एसटी महामंडळाचा वर्धापन दिन असल्याने, या नव्या सुविधांची सुरुवात विशेष ठरणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्रवास अधिक स्वच्छ आणि सोयीस्कर होईल, असा दावा केला जात असला तरी तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed