जनतेने नाकारले म्हणून नेत्याकडे गेलो!:माझी निवडून येण्याची क्षमता नव्हती हे मान्य, संजय राऊतांच्या टीकेला बच्चू कडूंचे उत्तर
![]()
संजय राऊत म्हणतात की माझी निवडून येण्याची क्षमता नव्हती म्हणून मी शिवसेनेत आलो, कदाचित ते बरोबर आहे. कारण राजकीय परिस्थितीच तशी बदलली आहे. ती जात-धर्माच्या नावावर गेली. ती पैशाकडे झुकली गेली, लोकशाही टिकवण्यासाठी तो लोकं नसतील तर ती टिकलच कशी असा सवाल शिवसेना नेते बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू म्हणाले की, मी शिवसेनेत प्रवेश केला हा निर्णय काही मजबुरी म्हणून घेतला नाही, तो मी परिस्थितीमुळे घेतला आहे. जनतेने नाकारले म्हणून नेत्याकडे जावे लागले. बच्चू कडू 25 वर्षे जनतेलाच आपला नेता समजत होता. आमचे कार्यकर्ते निवडणूक आली तेव्हा काही जण भाजप, काही राष्ट्रवादीत गेले. प्रहारच्या नावाने निवडून येत नाही म्हणून ते दुसऱ्या पक्षात गेले. बच्चू कडू म्हणाले की, 32 उमेदवार विधानसभेला उभे केले एकही निवडून आला नाही आम्ही काय चूक केली. लोकांसाठी चळवळ उभी केली. सामाजिक कार्य करणाऱ्यांनी लोकप्रतिनिधी होऊच नाही का? गुवाहटीला गेलेले सर्व निवडून आले मी एकटाच पडलो. मी चुका केल्या मान्य करतो,पण त्या इतक्याही मोठ्या नव्हता. कार्यकर्ता टिकावा म्हणून मी निर्णय घेतला. बच्चू कडू म्हणाले की, धनुष्यबाणातून प्रहार करणार आहे, प्रहार कायम राहणार आहे. गेली 25 वर्षे प्रहार जनतेसाठी लढला आहे झेंडे बदलले म्हणून अजेंडा बदलणार नाही तो कायम राहील. शेतकरी आणि दिव्यांग बांधव हे आमच्यासाठी प्रथम स्थानी असतील. हे सर्व एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले. त्यांनी सांगितले की तुम्ही जे करताल त्यासाठी शिवसेना तुमच्यासोबत आहे. काही गोष्टी लढून नाही तर गनिमी काव्याने सिद्ध कराव्या लागतात. हा छत्रपती शिवराय यांचा विचार आणि रणनिती राहिली आहे. माझा प्रवेश हा कार्यकर्त्यांच्या आग्रहातून झालेला आहे. मी शेतकरी मुद्दा सोडून बाहेर जाणार नाही. आमदारकी किंवा मंत्रीपदापेक्षा जनतेचे काम मोठे आहे. बच्चू कडू म्हणाले की, आमचे सर्व कार्यकर्ते हे पदासाठी नाही तर जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगासाठी काम करत आहे आमच्यामध्ये काही गटबाजी करणारा कार्यकर्ता नाही. प्रहारचे अस्तित्व कायम ठेवले हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. टीका करणाऱ्यांचे आपण आभार मानले पाहिजे. टीका फार मनावर घेऊ नये.पदासाठीच काम करायचे असते तर आम्ही विधानसभेलाच युती करत निवडणूक लढवली असती. घरी बसून टीका करणे खूप सोपे आहे.
