महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?:शेतकरी हक्क परिषद, मनसेचा आरोप; तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चौकशीची मागणी

[ads1]


महावितरणच्या सातारा मंडल व वडूज विभागातील कामकाजात मोठ्या प्रमाणावर अनियमितता, नियमबाह्य कामे आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शेतकरी हक्क परिषद व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी हक्क परिषदेचे अध्यक्ष अनिल सर्जेराव शिर्के व मनसेचे तालुकाप्रमुख सागर संभाजी बर्गे यांनी पत्रकार परिषदेत केली. महावितरणच्या बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर आणि सातारा मंडलाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हाळनोर यांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लेखी तक्रारी व पुरावे देऊनही संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. २०२० पासून NSC योजनेअंतर्गत मंजूर व कार्यान्वित कामे, वितरण कामे, निधी वाटप आणि ठेकेदारांना दिलेल्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना नियमापेक्षा अधिक रकमेची कामे दिल्याचा आरोपही करण्यात आला. अनधिकृत कृषी पंप रोहित्रे, डी.डी.एफ. योजनेतील मंजुरी, २२ केव्ही रोहित्र दुरुस्ती, तसेच सुमारे ६० कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या सर्व प्रकरणांसाठी तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष चौकशी समिती नेमावी, समितीला विशेष अधिकार व कालमर्यादा द्यावी, तसेच चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची अकार्यकारी पदावर बदली करावी, अशी मागणी शिर्के व बर्गे यांनी केली. चौकशी समितीसमोर पुरावे सादर करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मधुकर चव्हाण, रावळेश्वर घोरपडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *