Missing Link | मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ वाचणार; ‘मिसिंग लिंक’ आजपासून सुरू
Missing Link | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करण्यासाठी आखण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण आज होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन होणार असून, यामुळे बोरघाटातील कठीण वळणे आणि वाहतूक कोंडीतून प्रवाशांची कायमची सुटका होणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञान आणि विक्रमी रुंदीचा बोगदा
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये बांधण्यात आलेला २३.७५ मीटर रुंदीचा बोगदा, जो जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत, मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांचा सामना करत हे आव्हानात्मक काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.
सुमारे १०.५ किलोमीटर लांबीच्या या नवीन मार्गामुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचे अंतर ६ किलोमीटरने कमी होणार आहे. विशेष म्हणजे, हा रस्ता लोणावळा तलावाच्या (Lonavala Lake) सुमारे १००० फूट खालून जाणार असून, यासाठी जागतिक दर्जाच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
प्रवासाचा वेळ वाचणार आणि टोलवाढ नाही
या प्रकल्पात खोपोली एक्झिट (Khopoli Exit) ते लोणावळा (Lonavala) दरम्यान दोन भव्य बोगदे बांधण्यात आले आहेत, ज्यापैकी एक ८.९२ किमी आणि दुसरा १.७५ किमी लांबीचा आहे. हे दोन बोगदे जोडण्यासाठी टायगर व्हॅलीवर (Tiger Valley) १८२ मीटर उंचीचा भव्य केबल-स्टेड पूल (Cable-Stated Bridge) उभारण्यात आला आहे.
या नवीन मार्गामुळे घाट उतरताना किंवा चढताना होणारा वेळ वाचणार असून प्रवाशांना सुमारे ३० मिनिटांचा फायदा मिळेल. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर वाहनधारकांकडून घेतल्या जाणाऱ्या टोल (Toll) दरांमध्ये कोणतीही वाढ केली जाणार नाही. या मार्गावर प्रामुख्याने चारचाकी गाड्या आणि बसेसना प्राधान्य दिले जाईल.
News Title: Missing Link Project Inauguration Mumbai Pune Expressway
