परळी नगरपालिकेची दुसरी सर्वसाधारण सभा ठरली वादळी:एकतर्फी ठरावांना नगरसेवकांचा विरोध, माईक बंद करुन आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप
![]()
परळी नगरपालिकेची दुसरी सर्वसाधारण सभा न.प. सभागृहात पार पडली. पारदर्शक कारभाराच्या नावाखाली नगरसेवकांना अंधारात ठेवुन अनेक ठराव पारित करण्याच्या नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या कार्यपध्दतीस आम्ही विरोध केला असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. शहराच्या विकासासाठी घातक ठरणा निर्णयाला विरोध केल्यामुळे नगराध्यक्षांचे मनसुबे धुळीस मिळाल्याचा दावाही विरोधकांनी केला आहे. त्यामुळे ही सर्वसाधारण वादळी ठरली. निवडणुकीनंतर परळी नगरपालिकेची दुसरी सर्वसाधारण सभा न.प. सभागृहात बोलावण्यात आली होती. या सभेत नगरपरिषदेच्या विविध विभागांतर्गत मागविण्यात आलेल्या कामाच्या निविदेतील कमी दराच्या दरपत्रकास/निविदेस मान्यता देणे, 15 वा वित्त आयोगातील बंधनकारक व अबंधनकारक प्राप्त निधीचे शासन निर्णयातील मार्गदर्शक सुचनानुसार नियोजन करणे बाबत विचार विनिमय करणे, परळी वैजनाथ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 ची प्रलंबित देयके प्रदान करणे, आदी विषय ठेवण्यात आले होते. सभा सुरु झाल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक व्यंकटेश शिंदे यांनी या सभेत ठेवण्यात आलेले विषय सविस्तरपणे वाचुन दाखवावे अशी सुचना मांडताच सभेच्या अध्यक्षा नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांनी याबाबत नापसंती दिली. शिंदे यांनी सरस्वती नदीचे कॉंक्रीटीकरणास विरोध करत याबाबत चर्चा करावी अशा सुचना करताच नगराध्यक्ष पती बाजीराव धर्माधिकारी यांनी याबाबत उत्तर देण्याचा प्रयत्न करताच, गोंधळ निर्माण झाला आणि नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांनी या विषयावर चर्चा करण्याचे टाळले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगरसेवक नितीन बागवाले यांनी परळी शहरात सुरु असलेल्या अतिक्रमण मोहिमेत केवळ गरीब व्यापारी, नागरीकांची अतिक्रमणे काढली जात असल्याने ते बंद करुन सरसकट काढावेत, अंबेवेस येथील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे अशा सुचना मांडल्या. तर काँग्रेसचे नगरसेवक फारुख सय्यद गणी यांनी परळी शहर हे ज्योतिर्लिंग क्षेत्र असल्याने या ठिकाणी तळीरामांचा भाविकांना त्रास होवु नये यासाठी किमान प्रत्येक सोमवारी दारुबंदी करावी अशा सुचना मांडल्या. परंतु कुठलेही वाचन न करता लिहीलेल्या ठरावांना मान्यता देवुन स्वाक्षऱ्या घेण्याची सवय लागलेल्या न.प. पदाधिकऱ्यांना नगरसेवकांची ही जागरुकता खटकल्याने कुठल्याच विषयावर चर्चा न करता ही सभा गुंडाळावी लागली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. माईक बंद करुन आवाज दाबण्याचा प्रयत्न – व्यंकटेश शिंदे नगरपरिषदेची सर्वसाधारण बैठक आज पार पडली. त्यामध्ये अनेक गोष्टी बाबत प्रश्न विचारले असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. जनतेच्या हिताच्या विषयावर आवाज उठवत असताना माझा माईक बंद करुन आवाज दाबण्याचा प्रयत्न कारभाऱ्यांकडून केला गेला. सरस्वती नदीच्या काँक्रिट कामाच्या विषयी चर्चा टाळली. मागील सभेचे कार्यवृत्ताचे वाचन विषय सूचीवर असताना वाचन केले नाही. अनेक कामाच्या दरपत्रकांना मंजुरी पण सविस्तर दर पत्रक सभागृहा समोर ठेवले नाही. घाई करून सभा आटोपती घेतली, या विरोधात मी उठवलेला आवाज परळीच्या हितासाठी आहे. वैद्यनाथच्या आशीर्वादाने तो दबणार नाही. – व्यंकटेश शिंदे, नगरसेवक, परळी सभेत विकासाच्या मुद्यावर चर्चा परळी न.प. ची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या, सकारात्मक आणि विकासाभिमुख वातावरणात झाली. शहराच्या प्रगतीसाठी अनेक निर्णय यावेळी घेण्यात आले. यात नागापूर येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ 1 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारणे, जेटिंग सुविधेसह ट्रक-माउंटेड पाण्याचे दोन टँकर व डस्ट सक्शन मशीन खरेदी करणे, विश्वकर्मा भवन ते चांदापूर रस्ता आणि भोई गल्लीतील पारंपरिक मार्ग तीर्थक्षेत्र योजनेत समाविष्ट करणे, वैद्यनाथ नगरीमध्ये सोमवारी मांस विक्री बंद ठेवणे, उमर शहावाली दर्गा आणि मलिकपुरा दर्गा व सर्व कब्रस्तान मध्ये सभागृह बांधण्यासंदर्भात लवकरच शासनाकडे प्रस्ताव पाठवणे, सरस्वती नदीवरील प्रकल्पाबाबत पर्यावरण तज्ञांशी सल्लामसलत करून आवश्यक बदल शासनाला कळविण्यासाठी वैजनाथ सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची स्थापन करणे असे निर्णय घेऊन सभा यशस्वीरित्या संपन्न झाली. – पद्मश्री धर्माधिकारी, नगराध्यक्षा, परळी मुख्याधिकाऱ्यांसह अनेक नगरसेवक, सभापती गैरहजर परळी नगरपरिषदेच्या या सर्वसाधारण सभेस मुख्याधिकारी पी.एन. निगळ हे उपस्थित नव्हते. याबरोबरच सभागृहात पाच पैकी दोन सभापती आणि अनेक नगरसेवक गैरहजर होते. सभागृहात नगरसेवक, कर्मचारी वगळता कुणालाही प्रवेश नव्हता, कामकाजाचे व्हीडीओ रेकॉर्डींग नसल्याची माहिती असून या सभेत कोणते निर्णय घेतले ते शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन टाकल्यानंतरच अधिकृतपणे जनतेसमोर येणार आहे.
