महाराष्ट्र दिनी सुनेत्रा पवारांचा मोठा संकल्प:अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणारच; बीडमध्ये भावुक, विकासाचा नवा रोडमॅप जाहीर

0
730-x-548-new-2026-05-01t103341272_1777611963.jpg




महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड दौऱ्यात भावनिक होत दिवंगत अजित पवार यांच्या स्वप्नपूर्तीसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. अजितदादांनी बीडसाठी जे स्वप्न पाहिले, ते पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे सांगताना त्या प्रसारमाध्यमांशी बोलताना भावुक झाल्या. महाराष्ट्र दिनानिमित्त बीडमध्ये ध्वजारोहण करून नागरिकांना संबोधित करताना सुनेत्रा पवार यांनी विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडला. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दौरा होता. त्यांनी सुरुवातीलाच महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणात त्यांनी मराठवाड्याच्या परंपरेचा उल्लेख करत ही भूमी संत आणि वीरांची असल्याचे सांगितले. संत गोरोबाकाकांच्या जन्मभूमीत आपला जन्म झाल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी पूर्वीपासूनच सुरू असलेल्या कामांचा धांडोळा घेतला. अजित पवारांनी अल्पावधीत घेतलेल्या निर्णयांमुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली, असे त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, अजित पवारांच्या मनात बीडसाठी अनेक ड्रीम प्रोजेक्ट, होते. त्यांच्या निधनानंतर ती जबाबदारी आपल्या खांद्यावर आली असून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या विकासाच्या वाटचालीला पुढे नेणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्पांना गती देण्यात आल्याची माहिती देताना त्यांनी युवकांसाठी तंत्रज्ञानाधारित शिक्षणावर भर दिला. टाटा टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने एमआयडीसीमध्ये सुमारे 117 कोटी रुपयांचा आयटी प्रकल्प उभारला जात असून याचा लाभ सुमारे 60 हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. तसेच क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय महिला-पुरुष व्हॉलीबॉल आणि खो-खो स्पर्धांचे आयोजन यशस्वीरीत्या करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दळणवळणाच्या सुविधांबाबत बोलताना त्यांनी बीड-अहिल्यानगर आणि परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या उर्वरित कामांसाठी निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या विकासालाही चालना दिली जाणार असून जिल्ह्यासाठी 623 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाल्याचे त्यांनी जाहीर केले. याशिवाय, महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीत बीड जिल्ह्याने राज्यात आदर्श निर्माण केल्याचा उल्लेख त्यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांचा मुख्य सचिवांच्या हस्ते सन्मान झाल्याचे सांगत हा संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच राष्ट्रीय जनगणनेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहनही त्यांनी केले. सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख ठळक करण्याचे आवाहन

भाषणाच्या शेवटी सुनेत्रा पवार यांनी शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित राज्यकारभार सुरू असल्याचे सांगत बीडला राज्यातील अग्रगण्य जिल्हा बनवण्याचा संकल्प व्यक्त केला. आपण सर्वजण मिळून सक्षम, विकसित आणि आत्मनिर्भर बीड घडवूया, असे आवाहन करत त्यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख अधिक ठळक करण्याचेही नागरिकांना आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed