माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे झोपेत निधन:राष्ट्रवादीला मोठा धक्का; हृदयविकाराचा झटका ठरला घातक, राजकारणात शोककळा
![]()
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे झोपेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पहाटेच्या सुमारास परतूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने परतूर-मंठा मतदारसंघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांना त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता. झोपेतच आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत असून वातावरण अत्यंत भावनिक झाले आहे. सुरेशकुमार जेथलिया हे परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघातील प्रभावी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. आमदार म्हणून कार्य करताना त्यांनी विकासकामांवर विशेष भर दिला होता. रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधा तसेच ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आपल्या राजकीय अनुभवाचा उपयोग करून अनेक प्रकल्प मार्गी लावण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे ते मतदारसंघात विकासाभिमुख नेता म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची कार्यपद्धती लोकांशी जवळीक राखणारी होती. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणे, त्यांच्या समस्या ऐकून घेणे आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करणे, ही त्यांची खास शैली होती. त्यांच्या सहज संवादामुळे कार्यकर्ते त्यांच्याशी मोकळेपणाने बोलत असत. याच गुणांमुळे त्यांनी जिल्हाभरात लोकाभिमुख नेते म्हणून वेगळी ओळख निर्माण केली होती. पक्ष संघटनेतही त्यांची मजबूत पकड असल्याचे मानले जात होते. राजकीय प्रवासात त्यांनी महत्त्वाचे वळण घेत 15 मे 2025 रोजी काँग्रेस पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या वेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या संघटनात्मक कामात सक्रिय भूमिका बजावली. नुकत्याच पार पडलेल्या परतूर नगर परिषद निवडणुकीतही त्यांनी आघाडी घेतली होती. जरी नगराध्यक्षपद थोडक्यात हुकले, तरी त्यांच्या निवडणूक व्यवस्थापनाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. विकासासाठी झटणारा नेता निवडणुकीनंतरही त्यांनी कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवत पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबवले गेले. त्यामुळे ते केवळ राजकारणी नसून समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जात होते. दरम्यान, त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. परतूर- मंठा मतदारसंघाने एक अभ्यासू, जनतेशी नाळ जोडलेला आणि विकासासाठी झटणारा नेता गमावल्याचे अनेकांनी म्हटले आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांच्या कार्याची आठवण काढली जात आहे. महाराष्ट्राने कर्तृत्ववान, जिव्हाळ्याचे नेतृत्व गमावले – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे सदस्य श्री. सुरेशकुमार जेथलिया यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. सुरेशकुमार जेथलिया हे एक अभ्यासू, संवेदनशील आणि जनतेच्या प्रश्नांशी घट्ट नाळ जोडलेले नेतृत्व होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यावर ठोस उपाययोजना केल्या. राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने मंठा-परतूर मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान, लोकाभिमुख आणि जिव्हाळ्याचे नेतृत्व गमावले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.
