मुंबईत एमआयएमला आणखी एक धक्का:जात पडताळणीचा फटका; रोशन शेख अडचणीत, महापालिकेत मोठा उलथापालथीचा संकेत
![]()
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षासाठी मुंबईतून मोठी धक्कादायक घडामोड समोर आली आहे. मानखुर्द–शिवाजीनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 138 मधून निवडून आलेल्या नगरसेविका रोशन इरफान शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. तपासणीदरम्यान सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर परभणी येथील जात पडताळणी समितीने हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांच्या नगरसेवक पदावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून एमआयएमसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 138 हा इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी राखीव होता. या जागेवरून रोशन शेख यांनी 2026 च्या निवडणुकीत विजय मिळवला होता. निवडणुकीनंतर त्यांनी ‘जुलाह’ या ओबीसी प्रवर्गातील जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र, या प्रमाणपत्रावर शंका उपस्थित झाल्याने त्याची पडताळणी परभणी येथील जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे करण्यात आली. या प्रकरणात निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले समाजवादी पक्षाचे उमेदवार मोहम्मद महफूज शेख यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी रोशन शेख यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण अधिकृतरीत्या पडताळणी समितीकडे वर्ग करण्यात आले. तपासणीनंतर संबंधित कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने समितीने ते प्रमाणपत्र अवैध ठरवले. या निर्णयानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मोहम्मद महफूज शेख यांनी मुंबई महापालिका प्रशासन आणि निवडणूक विभागाकडे पत्र पाठवून रोशन शेख यांचे नगरसेवक पद तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांना अपात्र घोषित करावे आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवावी. जर रोशन शेख यांचे नगरसेवक पद अधिकृतरीत्या रद्द झाले, तर त्याचा थेट फायदा दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला मिळू शकतो. अशा परिस्थितीत समाजवादी पक्षाचे मोहम्मद महफूज शेख यांना नगरसेवक म्हणून संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रभागात तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना (ठाकरे गट) चे अर्जुन शिंदे होते. निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दरम्यान, या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी रोशन शेख यांच्या बाजूने सुरू असल्याची माहिती आहे. उच्च न्यायालयात आव्हान देऊन दिलासा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे मुंबई महापालिकेतील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, एमआयएमच्या आठ नगरसेवकांच्या ताकदीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
