फडणवीस सरकारचे 'आपले सरकार' ठप्प:तांत्रिक बिघाडाने गोंधळ, नागरिक त्रस्त; मंत्री आशिष शेलारांचा तातडीचा आदेश
![]()
राज्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे आपले सरकार पोर्टल गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंद असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. 27 एप्रिलच्या रात्रीपासून या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नागरिकांना जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र तसेच शिष्यवृत्ती अर्ज यांसारख्या अत्यावश्यक सेवांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अचानक बंद पडलेल्या प्रणालीमुळे सामान्य नागरिकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वच स्तरांवर अस्वस्थता वाढली आहे. दररोज लाखो लोक या पोर्टलच्या माध्यमातून विविध शासकीय कागदपत्रांसाठी अर्ज करतात. सध्या स्पर्धा परीक्षांचे अर्ज भरणे आणि शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने या बिघाडाचा मोठा परिणाम विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर झाला आहे. अनेकांचे अर्ज वेळेत पूर्ण होत नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे. परिणामी, सरकारी सेवा केंद्रांवरही नागरिकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री आशिष शेलार यांनी तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत पोर्टलमधील तांत्रिक अडचणींचा सखोल आढावा घेण्यात आला. तसेच समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आयटी तज्ज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अधिकाऱ्यांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. केवळ बिघाड दुरुस्त करण्यावरच नाही, तर संपूर्ण प्रणाली अधिक सुरक्षित आणि वेगवान करण्यावरही सरकारचा भर आहे. यासाठी मायक्रोसॉफ्ट, डेल आणि कॉमवॉल्ट यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या भारतीय प्रतिनिधींशी समन्वय साधला जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भविष्यात अशा अडचणी टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तज्ज्ञांची टीम 24 तास काम करत आहे. पोर्टल अधिक सक्षम आणि सुरक्षित बनवून ते लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू केले जाईल. तोपर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. सुधारणा करण्याचे काम अंतिम टप्प्यात दरम्यान, संबंधित समितीने प्राथमिक तपास पूर्ण केला असून आवश्यक सुधारणा करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत पोर्टल पुन्हा सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तोपर्यंत नागरिकांनी जवळच्या सेवा केंद्रांशी संपर्क साधून आवश्यक कामे पूर्ण करावीत, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
