टरबूज खाऊन मृत्यू प्रकरणात नवा खुलासा:मृताच्या अंतर्गत अवयवांना 'हिरवट' रंग; न्यायवैद्यक चाचणीत घातक विषबाधा झाल्याचे स्पष्ट

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-01t10_1777613002.png




मुंबईतील बिर्याणीनंतर कलिंगड खाऊन मृत्यू झालेल्या एका कुटुंबाच्या प्रकरणात एक नवी माहिती पुढे आली आहे. प्राथमिक न्यायवैद्यक चाचणीत मृतांच्या महत्त्वाच्या अंतर्गत अवयवांना हिरवट रंग आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा प्रकार अत्यंत घातक विषबाधा किंवा एखाद्या षडयंत्राचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4 जणांचा बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली होती. या मृत्यूंमुळे राज्यासह देशात खळबळ माजली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अब्दुल्ला दोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन दोकाडिया, मुलगी आएशा दोकाडिया व जैनब दोकाडिया यांचा बिर्याणी व त्यानंतर कलिंगड खाल्यामुळे मृत्यू झाला होता. पण आता प्राथमिक न्यायवैद्यक चाचणीत मृतांच्या अंतर्गत अवयवांना हिरवट रंग आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या मृत्यूंविषयी तर्कवितर्क लढवले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शवविच्छेदनानंतर करण्यात आलेल्या न्यायवैद्यक तपासणीत मृतांचा मेंदू, हृदय व आतडी यांचा रंग हिरवट झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सामान्यतः साध्या अन्न विषबाधेत अशा प्रकारे अंतर्गत अवयवांचा रंग बदलत नाही. त्यामुळे हा प्रकार एखाद्या अत्यंत विषारी रासायनिक घटकांचा शरीरात शिरकाव झाल्यामुळे घडला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. अब्दुल्ला दोकाडियांच्या शरीरात आढळले मॉर्फिन प्रस्तुत प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मृत अब्दुल्ला यांच्या शरीरात मॉर्फिन आढळून आले आहे. मॉर्फिन हे एक अत्यंत शक्तिशाली वेदनाशामक औषध आहे. ते सामान्यतः शस्त्रक्रिया किंवा तीव्र कर्करोगाच्या वेदना कमी करण्यासाठी वैद्यकीय देखरेखीखाली वापरले जाते. त्यामुळे अब्दुल्ला यांच्या शरीरात हे औषध कसे काय आले? याचा शोध आता पोलिस घेत आहेत. प्रारंभी हा प्रकार अन्नातून झालेल्या विषबाधेचा असावा असा अंदाज होता. पण न्यायवैद्यक चाचणीतील नवीन निरीक्षणे पाहता हा प्रकार अन्न विषबाधेपेक्षा पूर्णतः वेगळा असल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला जात आहे. त्यामुळे एखाद्या विशिष्ट पदार्थाचा डोस दिल्यामुळे किंवा रसायनाचा मानवी शरीरावर असा परिणाम होतो का? या दिशेने आता तपास यंत्रणा तपास करत आहेत. प्राथमिक चाचणीत ही माहिती पुढे आली असली, तरी पोलिस व वैद्यकीय तज्ज्ञांना या प्रकरणी अद्याप अंतिम न्यायवैद्यक अहवालाची प्रतिक्षा आहे. हा अहवाल आल्यानंतरच या चौघांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला? हे स्पष्ट होणार आहे. नेमकी कशी घडली होती घटना? अब्दुल्ला दोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन दोकाडिया, मुलगी आएशा दोकाडिया व जैनब दोकाडिया यांचा बिर्याणी व त्यानंतर कलिंगड खाल्यामुळे मृत्यू झाला होता. या कुटुंबातील 9 सदस्यांनी 25 एप्रिल रोजी रात्री 10.30 च्या सुमारास आपल्या नातलगांसोबत एकत्र बसून भोजन केले होते. त्यांनी त्यांचे नातलग आपापल्या घरी परतले होते. त्यानंतर उपरोक्त चौघांनी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास घरी असणारे कलिंगड घाल्ले होते. त्यानंतर रविवारी पहाटे 5 च्या सुमारास या चौघांचीही प्रकृती बिघडली होती. त्यांना भयंकर प्रमाणात उलट्या झाल्या होत्या. त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडली. शेजाऱ्यांनी त्यांना तत्काळ लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण तिथे त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed